पुडुचेरीतील सत्तारूढ काँग्रेस पक्षामध्ये निर्माण झालेल्या पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर तेथील नायब राज्यपाल किरण बेदी यांना पदावरून दूर करण्यात आले असून तेलंगणाच्या राज्यपाल टी. सुंदरराजन यांच्याकडे पुडुचेरीची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.

पुडुचेरीच्या नायब राज्यपालपदी नव्या व्यक्तीची नियुक्ती होईपर्यंत सुंदरराजन यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे माध्यम सचिव अजयकुमार सिंह यांनी एका निवेदनामध्ये म्हटले आहे.

काँग्रेस आमदाराचा राजीनामा

पुम्डुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांचे विश्वासू सहकारी आणि काँग्रेसचे आमदार ए. जॉन कुमार यांनी मंगळवारी आमदारकीचा राजीनामा दिल्याने येत्या महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्तारूढ काँग्रेसला धक्का बसला आहे. जॉन कुमार यांनी राजीनामा दिल्याने पुडुचेरी विधानसभेत सत्तारूढ आणि विरोधकांचे संख्याबळ समसमान झाले आहे. विधानसभेत काँग्रेस आघाडाचे आता १४ सदस्य असून विधानसभेची सदस्यसंख्या २८ आहे.

ए. जॉन कुमार हे २०१९ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत कामराजनगर मतदारसंघातून विजयी झाले होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी बुधवारी पुडुचेरीच्या दौऱ्यावर येत असून त्यापूर्वी पक्षाला रामराम करणाऱ्या आमदारांची संख्या चार झाली आहे. जॉन कुमार यांनी विधानसभेचे अध्यक्ष व्ही. पी. शिवकोलुंधू यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांच्याकडे स्वहस्ताक्षरात लिहिलेला राजीनामा सुपूर्द केला, असे सूत्रांनी सांगितले.

जॉन कुमार यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसचे विधानसभेतील संख्याबळ १० वर आले आहे. त्यामुळे आता सत्तारूढ आणि विरोधी पक्ष सदस्यांची संख्या समसमान झाली आहे. पुडुचेरी विधानसभेत तीन नियुक्त प्रतिनिधी आहेत. यापूर्वी ए. नम:शिवायम आणि मल्लादी कृष्ण राव हे दोन मंत्री आणि काँग्रेसचे सदस्य ई. थिप्पाइंजन यांनी काही महिन्यांपूर्वीच आमदारकीचे राजीनामे दिले आहेत.