दोन दिवसांपूर्वी भारतीय सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या चकमकीत कुख्यात पाकिस्तानी दहशतवादी अबु दुजानाचा खात्मा झाला. चकमकीत ठार होण्यापूर्वी दुजानाने आत्मसमर्पणास नकार दिला होता. ‘मी गिलगिट-बाल्टिस्तान येथे राहणाऱ्या माझ्या आई-वडिलांना जिहादसाठी सोडून जात आहे,’ असे त्याने लष्कराच्या अधिकाऱ्यांना म्हटले होते. हा भाग पाकिस्तानातील खैबरपख्तूनवा प्रांतात येतो. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार लष्कराच्या एका अधिकाऱ्याने काश्मिरी नागरिकाच्या माध्यमातून दुजानाबरोबर फोनवर चर्चा करत त्याला आत्मसमर्पण करण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न केला होता. या वृत्तानुसार दुजानाबरोबर काश्मिरी नागरिकाने सुरूवातीला काही वेळ स्वत: चर्चा केली त्यानंतर त्याने फोन लष्कराच्या अधिकाऱ्याला बोलण्यासाठी दिला.

दुजानाने लष्करी अधिकाऱ्याला म्हटले, ‘कसे आहात ? मी काय म्हणतोय, कसे आहात?.’ यावर ते अधिकारी म्हणाले, ‘आमचं सोड. तू शरण का येत नाहीस? तू या मुलीशी लग्न केलं आहेस. तू जे काही करतोस ते योग्य नाही.’ या वृत्तानुसार अधिकाऱ्याने दुजानाला समजावण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान युवकांचा वापर करत काश्मीरमध्ये हिंसा करत आहे, असे सांगितले. पण दुजानाने हे नाकारले व आत्मसमर्पण करणार नसल्याचे म्हटले.

‘टीओआय’ च्या वृत्तानुसार दुजानाने लष्करी अधिकाऱ्यास म्हटले, ‘मी शहीद होण्यासाठी निघालो होतो. आता मी काय करू. ज्याला खेळ खेळायचा आहे, त्यांनी खेळावे. कधी आम्ही पुढे, कधी तुम्ही, आज तुम्ही पकडलं आहे. तुमचं अभिनंदन. ज्याला जे करायचं आहे, ते करा.’ आत्मसमर्पणास नकार देत तो म्हणाला, ‘मी शरण येणार नाही. माझ्या नशिबात जे लिहिलंय तेच अल्ला करेल, ठीक आहे?’

त्या लष्करी अधिकाऱ्याने दुजानाला त्याच्या आई-वडिलांची आठवण करून दिली. पण तो याला बधला नाही. तो म्हणाला, ‘आई-वडील माझ्यासाठी तेव्हाच मेले, जेव्हा मी त्यांना सोडून आलो.’ दरम्यान, संभाषण सुरू असतानाच दुजानाने फोन बंद केला. दुजाना फोनवरून पाकिस्तानी सुरक्षा संस्थांबरोबर संपर्कात असल्याचा संशय सुरक्षा दलांना आहे. भारतीय सुरक्षा दलाच्या ‘ऑपरेशन ऑल आऊट’ अंतर्गत मारला जाणारा अबु दुजाना हा ११९ वा दहशतवादी ठरला होता.