दिल्लीतील वीजकपात धोरणाविरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे. केंद्र सरकारच्या वीज धोरणाविरोधात नांगलोई रेल्वे स्थानकावर निदर्शने करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंह लवली व ज्येष्ठ नेते सज्जन कुमार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत ‘हर हर मोदी-घर घर मोदी’ अभियान छेडले होते. त्याच धर्तीवर काँग्रेसने दिल्लीत ‘हर हर मोमबत्ती- घर घर मोमबत्ती’ अभियान छेडले आहे.
गेल्या दहा दिवसांपासून राष्ट्रीय राजधानी परिसरात वीजकपात सुरू आहे. दिल्लीत सध्या राष्ट्रपती राजवट असल्याने नायब राज्यपाल नजीब जंग केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा करून प्रशासकीय निर्णय घेत आहेत. काँग्रेसच्या गेल्या पंधरा वर्षांच्या काळात दिल्लीकरांवर कधीही वीज संकट कोसळले नसल्याचा दावा अरविंदर सिंह लवली यांनी केला आहे. मात्र केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर अवघ्या महिनाभरात दिल्लीकरांना विजेचा ‘झटका’ बसला. त्यामुळे खरोखरच ‘अच्छे दिन’ आले आहेत का, असा प्रश्न लवली यांनी उपस्थित केला. आज सकाळी राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात असलेल्या नागलोई रेल्वे स्थानकावर लवली, सज्जनकुमार व प्रदेश प्रवक्ते मुकेश शर्मा शेकडो समर्थकांसह दाखल झाले. त्यांनी रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला. संतप्त निदर्शनकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणा दिल्या. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा केला. काँग्रेस नेत्यांना व कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करून काही वेळानंतर सोडून देण्यात आले. दिल्लीत ल्युटन्स झोन या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची निवासस्थाने-कार्यालये असलेल्या भागात २४ तास वीज व पाणी असते. मात्र पूर्व, दक्षिण, पश्चिम, दिल्लीच्या सीमेवरील वसाहत, मंगालेपुरी, त्रिलोकपुरीसारख्या भागात रात्रभर वीज गूल असते. वीज नसल्याने पाण्याची समस्या बिकट झाली आहे. काँग्रेस रस्त्यावर उतरून तर आम आदमी पक्ष वस्ती (मोहल्ला) सभा घेऊन निदर्शने करीत आहे.
आज पुन्हा निदर्शने
वीज व पाणी प्रश्नावर काँग्रेस नेते व कार्यकर्ते रविवारी नवी दिल्ली मतदारसंघात निदर्शने करणार आहेत. पक्षाचे प्रसारमाध्यम प्रमुख व माजी केंद्रीय मंत्री अजय माकन आम आदमी पक्ष व भाजपने दिल्लीकरांची दिशाभूल केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, केंद्रात भाजपला बहुमत मिळाल्यानंतरही दिल्लीकरांवर अन्याय होत आहे. आपला या समस्येशी काहीही देणे-घेणे नाही. भाजप सरकार डोळे मिटून बसले आहे. असेच राहिले तर दिल्लीकर रस्त्यावर उतरतील, असा इशारा दिला.

भाजप आमदारांचा भाव वधारला
दिल्लीच्या वसाहतींमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र त्यासाठी नागरिकांना स्थानिक आमदाराचे पत्र दिल्ली जल मंडळाला सादर करावे लागते. भाजप आमदारांच्या पत्रावर तात्काळ टँकर पाठविला जातो व काँग्रेस आमदारांच्या पत्राकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप लवली यांनी केला. दिल्लीतील अनधिकृत वस्त्यांमध्ये अत्यंत अरुंद रस्ते असल्याने पाण्याचा टँकर पाठविण्यास जल मंडळाचे अधिकारी नकार देतात. मात्र अशा ठिकाणीदेखील भाजप आमदारांच्या पत्रानंतर टँकर पाठविला जातो. काँग्रेसच्या आमदारांना दुय्यम वागणूक दिली जाते, असा आरोप लवली यांनी केला.