पॅरिस येथील हल्ल्यानंतर आता ब्रसेल्समध्ये मेट्रोसेवा बंद करण्यात आली असून दहशतवादी हल्ल्यांबाबत धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. पॅरिस हल्ल्यातील अजून एक हल्लेखोर फरार असून बेल्जियममध्ये हल्ल्याची शक्यता वर्तवली आहे. लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये कारण हल्ल्याची शक्यता वाढली आहे. बेल्जियममधील जिहादी पॅरिससारखाच हल्ला करण्याच्या तयारीत आहेत अशा सूचना मिळाल्या आहेत. तपासकर्त्यांनी आता अजूनही फरार असलेला सलाह अब्देसलाम याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पॅरिस हल्ल्यात तो सामील होता. त्या हल्ल्यात १३० लोक मारले गेले होते. त्या हल्ल्यानंतर काही हल्लेखोर युरोपातील देशात पळाल्याचा संशय आहे. युरोपीय समुदायाने पासपोर्ट मुक्त शेनझेन भागात सीमा बंद केल्या आहेत.

तुर्कस्थानात एकास अटक
तुर्कस्थानने एका बेल्जियन नागरिकाला अटक केली असून त्याचे नाव अहमेत दाहमानी आहे. तो २६ वर्षांचा आहे, असे डोगन वृत्तसंस्थेने म्हटले आहे. त्याने पॅरिसमधील हल्ल्यासाठी ठिकाणांची पाहणी केली होती. त्याला अंत्याला या तुर्कस्थानच्या दक्षिणेकडील शहरात ताब्यात घेतले असून त्याला सीमा ओलांडण्यास मदत करणाऱ्या दोन सीरियन नागरिकांनाही ताब्यात घेतले आहे.
सुरक्षा मंडळाचा ठराव
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने आयसिसच्या दहशतवाद्यांविरोधात हवी ती कारवाई करण्याची मुभा संबंधित देशांना दिली आहे. संयुक्त राष्ट्रांनी तसा ठराव मालीतील बामको येथील हॉटेलमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर केला आहे.
आतापर्यंत आयसिसने पॅरिसमध्ये १३०, बैरूतमध्ये ४४, तर रशियन विमान पाडल्याच्या घटनेत २२४ जणांना ठार केले आहे. पॅरिसमध्ये लोक भीती सोडून शुक्रवारी रात्री रस्त्यावर हिंडत होते. काहीजण कॅफे टेरेसवर होते. ला बेली इक्विप रेस्टॉरंटमध्ये १८ जण मारले गेले त्याच्या आवारात अनेक लोकांनी गर्दी केली होती.
मार्सेली राष्ट्रगीत सादर करून पुष्पांजली वाहण्यात आली. दरम्यान पॅरिस हल्ल्यातील सूत्रधार अब्देलहमीद अबौद हा पोलिसांच्या छाप्यात बुधवारी मारला गेला. तसेच त्याची चुलतबहीण हसना ऐटबोलाशेन ही आत्मघाती स्फोटात ठार झाली.