पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या बालाकोट येथे घुसून हवाई दलाने केलेल्या हल्ल्याचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) फायदा होणार असल्याचे चित्र आहे. कारण टाइम्स नाऊ आणि वीएमआरच्या सर्वेक्षणानुसार बालाकोटच्या हवाई हल्ल्यानंतर एनडीएला १३ जागांसाठी फायदा होताना दिसतो आहे. यापूर्वीच्या सर्वेक्षणात एनडीएला २७० जागाच मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार, हा आकडा वाढून २८३ होण्याची शक्यता आहे.

भारतीय हवाई दलाने १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा हल्ल्यानंतर २६ फेब्रुवारीला पाकिस्तानात घुसून हवाई हल्ला केला होता. याचा परिणाम केवळ एनडीएवरच नव्हे तर काँग्रेस आणि सहकारी पक्षांवरही होणार आहे. यामुळे काँग्रेस आघाडीच्या जागा घटतील, त्यांच्या जागांचा आकडा १३५ राहिल असा अंदाज आहे. जो हवाई हल्ल्यापूर्वी १४४ इतका राहिल असे भाकीत वर्तवण्यात येत होते.

बालाकोटच्या हवाई हल्ल्यानंतर काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांचे नुकसान तर होताना दिसतच आहे. मात्र, भाजपा आणि काँग्रेसबरोबरच तिसऱ्या आघाडीतील पक्षांच्याही जागांमध्ये घट होताना दिसते आहे. हवाई हल्ल्यापूर्वी तिसऱ्या आघाडीतील पक्षांना १२९ जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आता त्यांना ४ जागांवर नुकसान होऊन १२५ जागा मिळतील असे सांगण्यात येत आहे. या पक्षांमध्ये बीजेडी, टीएमसी, टीडीपी, टीआरएस आणि वायएसआर काँग्रेस यांचा समावेश आहे. त्याचबरोबर सपा-बसपा आणि राजदमध्ये उत्तर प्रदेशमध्ये एकत्र येऊन लढत आहेत.

बालाकोटनंतर उत्तर प्रदेशात भाजपाला सर्वाधिक लाभ

हवाई दलाच्या हल्ल्यानंतर उत्तर प्रदेशात सपा-बसपा आणि राजदच्या महाआघाडीला मोठा झटका बसू शकतो. तर दुसरीकडे एनडीएला उत्तर प्रदेश, आसाम, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये फायदा मिळत आहे. एनडीएला सर्वाधिक उत्तर प्रदेशात ३ जागांवर फायदा मिळू शकतो. हल्ल्यापूर्वीच्या सर्वेक्षणात उत्तर प्रदेशात भाजपाला ३९ जागा मिळणतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता आता हा आकडा आता ४२ झाला आहे.