पश्चिम बंगालमध्ये भांगर परिसरातील विद्युत प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या विरोधाने मंगळवारी हिंसक वळण घेतले. या हिंसाचारात दोघांचा मृत्यूही झाला. पोलिसांनी गोळीबार केल्याचा आंदोलकांनी आरोप केला आहे. पोलिसांनी हा आरोप फेटाळला आहे. संतप्त आंदोलकांनी पोलिसांच्या दहा गाड्याही पेटवल्या. या हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या एका आंदोलकाचे नाव मुफीजुल अली खान आहे. २६ वर्षीय मुफीजुल हा कोलकाता येथील रहिवासी होता. मुफीजुलच्या पाठीवर गोळी लागल्याची जखम आढळल्याचे रूग्णालयाने म्हटले आहे. अतिरक्तस्त्रावामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या आंदोलनादरम्यान अनेकजण जखमी झाल्याचेही सांगण्यात येते.

हिंसक जमावाने दहा गाड्या जाळल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच गोळीबार पोलिसांनी केला नव्हता. उलट आंदोलकांकडूनच गोळीबार करण्यात आल्याचे ते म्हणाले. या आंदोलनात बाहेरची व्यक्ती किंवा माओवादी लोक सहभागी झाले होते का, या दृष्टीनेही या प्रकरणाचा तपास केला जाईल, असेही पोलिसांनी सांगितले.
बंगालमधील भांगर परिसर मागील वर्षीच्या ऑक्टोबरपासून सातत्याने धुमसत आहे. पश्चिम बंगाल आणि बिहारच्या एका भागात पॉवर ग्रीड लावण्याबाबत चर्चा सुरू होती. याला येथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. २०१३ मध्ये येथील १३ एकर जमीन या प्रकल्पासाठी घेण्यात आली होती. परंतु, काही काळानंतर शेतकऱ्यांनी याला विरोध करण्यास सुरूवात केली होती.
बाजारभावानुसार जमिनीचे पैसे दिले नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे शेतकरी आपली जमीन पुन्हा मागत आहेत. सध्या येथील काम थांबवण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी काही लोकांना अटकही केली आहे.