काही तरुणांना भरधाव वेगात दुचाकी पळवण्याबरोबर टू व्हीलरवर स्टंट करण्याची सवय असते. काही वेळा हे स्टंट जीवावर सुद्धा बेतू शकतात. बंगळुरुमध्ये अशाच दुर्घटनेत तीन विद्यार्थ्यांना आपले प्राण गमवावे लागले. दुचाकीवर स्टंट करत असताना झालेल्या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन अल्पवयीन मुले आहेत.

बंगळुरु वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाल्लारी रोडवर रविवारी सकाळी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. तिघेही जीकेव्हीके रोडवर स्टंट दाखवत होते. त्यांनी सुरक्षेसाठी आवश्यक असणारे हेल्मेट घातले नव्हते. दोघे होंडा डीओ तर एकजण यामाहा आरएक्स १०० बाईक चालवत होता. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे.

अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. एकाला रुग्णालयात आणल्यानंतर मृत घोषित करण्यात आले अशी माहिती येलाहंका वाहतूक पोलिसांनी दिली. दोघेजण शाळेत तर एकजण कॉलेजला शिकत होता. रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांनी पोलिसांना या अपघाताची माहिती दिली. विली आणि दुसरे स्टंट करत असताना हा अपघात झाला असे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे