डोनाल्ड ट्रम्प मिसिसीपी आणि मिशीगन राज्यांत विजयी, दोघेआमने-सामने येण्याचे संकेत
अमेरिकी अध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळवण्यासाठीच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी मिसिसीपी व मिशीगन या दोन्ही राज्यांत विजय मिळवला आहे तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांना केवळ मिसिसीपीत विजय मिळाला असून त्यांना मिशीगनमध्ये बर्नी सँडर्स यांनी चांगलीच टक्कर दिली आहे. बर्नी सँडर्स यांना विजयामुळे संजीवनी मिळाली असून डेमोक्रॉटिक पक्षाच्या आघाडीवर असलेल्या उमेदवार व माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांना दणका बसला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना रोखण्याचे प्रयत्न अपयशी ठरले असून त्यांनी मिसिसीपी व मिशीगन येथे विजय मिळवून पकड मजबूत केली आहे. सँडर्स यांचा विजय झाला असला, तरी मंगळवारच्या या लढतीनंतरही श्रीमती क्लिंटन व ट्रम्प यांची आघाडी कायम आहे. क्लिंटन यांनी कृष्णवर्णीयांच्या मदतीने मिसिसीपीत सहज विजय मिळवला. त्यांना आवश्यक असलेल्या मतांच्या निम्मी मते मिळाली आहेत. ट्रम्प यांनी टेक्सासचे सिनेटर टेड क्रूझ यांना पराभूत केले आहे. क्रूझ यांनी काही पराभवानंतर ट्रम्प यांच्या मंगळवारच्या विजयाबाबत साशंकता व्यक्त केली होती पण ती फोल ठरली. पुढील आठवडय़ात ओहिओ व फ्लोरिडात मतदान होत आहे. ट्रम्प यांना रोखण्याची ती शेवटची संधी मानली जाते. ओहिओचे गव्हर्नर जॉन कासिच हे मिशीगनमध्ये क्रूझ यांच्यापेक्षा मागे पडले. त्यांच्या पदरी निराशा आली. फ्लोरिडाचे गव्हर्नर मार्को रूबियो यांनाही फार यश मिळाले नाही आता त्यांची आशा पुढील मंगळवार फ्लोरिडात होणाऱ्या लढतीवर आहे. ट्रम्प यांच्या पेक्षा मीच देशासाठी योग्य आहे, असे श्रीमती क्लिंटन यांनी सांगितले. ज्यांनी कुणी माझ्यावर टीका केली ते भुईसपाट झाले, असे ट्रम्प यांनी फ्लोरिडा येथे सांगितले. सँडर्स यांनी सांगितले, की मिशीगनमधील विजयाने आमचे प्रभावक्षेत्र वेगळे आहे हेच दिसून आले आहे. आमची मते लोकांना कळत जातील तसे ते माझ्या उमेदवारीला पािठबा देतील. मिशीगन व मिसिसीपीत अर्थव्यवस्थेचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. डेमोक्रॉटिक पक्षातील दहापकी आठ जणांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली, असे मतदानोत्तर चाचण्यातून दिसले आहे. मिशीगन राज्यात कर्मचारी वर्ग मोठा आहे, मोठी महाविद्यालये व विद्यापीठे आहेत. तेथे सँडर्स यांच्या विजयाची शक्यता वाटत नसताना त्यांनी विजय मिळवला. क्लटन यांनी मिसिसीपीत सँडर्स यांना दणका दिला. दर १० पकी ९ मते त्यांना पडली आहेत, डेमोक्रॉटिक पक्षाचे दोन तृतीयांश मतदार हे कृष्णवर्णीय आहेत. आता क्लटन यांना पुढच्या मंगळवारी यशाची आशा आहे. फ्लोरिडा व ओहिओतील लढती आता ट्रम्प व क्रूझ यांची झुंज आणखी निर्णायक करणार आहेत. आतापर्यंत क्लटन यांना १२१४ तर सँडर्स यांना ५६६ मते मिळाली आहेत. ते डेमोक्रॉटिक पक्षाचे असून उमेदवारी मिळण्यासाठी २३८३ प्रतिनिधी मते मिळण्याची गरज आहे.
रिपब्लिकन पक्षात अध्यक्षीय उमेदवारीसाठी १२३७ प्रतिनिधी मते आवश्यक असून ट्रम्प यांना ४२८ तर क्रूझ यांना ३१५ मते मिळाली आहेत.