नव्या कृषी विधेयकांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी रस्ता रोको केला आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रुळावरच शेतकऱ्यांनी आंदोलनं सुरू केल्यानं रेल्वे सेवाही विस्कळीत झाली असून, पंजाब, हरयाणात या विधेयकांविरोधात तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं उग्र रूप लक्षात घेऊन दिल्लीत हरयाणा सीमेलगतची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

विविध शेतकरी संघटनांची अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, अखिल भारतीय शेतकरी संघटना, भारतीय किसान संघटना, अखिल भारतीय किसान महासंघ या देशव्यापी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात ३०हून अधिक शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत. याशिवाय, सीटू, हिंद मजदूर सभा, नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आदी १० कामगार संघटनांनीही पाठिंबा दिला आहे.

आणखी वाचा- शेतकरी आंदोलन : म्हशींवर बसून बिहारमधील शेतकऱ्यांनी नोंदवला सहभाग

मोदी सरकारनं तीन कृषि विधेयकांना शेतकऱ्यांमधून विरोध वाढताना दिसत आहे. भारत बंदची हाक दिल्यानंतर आज शेतकरी रस्त्यावर उतरले. महामार्गावरील वाहतूक रोखत शेतकऱ्यांनी धरणं देणं सुरू केलं आहे. हरयाणा, पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी रेल्वेही रोखल्या असून, शेतकरी आंदोलन लक्षात घेऊन अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

बिहारची राजधानी पाटणामध्ये आंदोलनादरम्यान भाजपा आणि जन अधिकार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. कृषि विधेयकांच्या विरोधात जेएपीचे कार्यकर्ते पाटणातील भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर आंदोलन करत होते. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर भाजपा आणि जेएपी कार्यकर्त्यांमध्ये वाद बाचाबाची झाली. वाद शिगेला जाऊन दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

आणखी वाचा- मोदी सरकारविरोधात शेतकरी किती वेळा उतरले रस्त्यावर?

आणखी वाचा- नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम बनवणार : राहुल गांधी

शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली-चंदीगढ बससेवा बंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे रेल्वे सेवाही ठप्प झाली असून, रेल्वे रुळांवर नजर ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनानं सुरक्षा वाढवली आहे.