नितीश कुमार यांनी आज सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर सलग चौथ्यांदा ते बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. तर, अपेक्षे प्रमाणे भाजपा नेते तारकिशोर प्रसाद व रेणू देवी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पाटण्यातील राजभवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना शपथ दिली.

या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि भाजपाचे बिहारचे प्रभारी देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

भाजपा नेत्या रेणुदेवी व मी बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ, असे संकेत आहेत. असं भाजपाचे विधिमंडळ नेते तारकिशोर प्रसाद सिंह यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.

तर, भाजपा नेत्या रेणू देवी यांना तुम्ही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहात का? असे विचारले असता, त्यांनी देखील सूचक विधान केलं होतं. ”ही एक मोठी जबाबदारी आहे. जर लोकांनी आमची निवड केली असेल आणि एनडीएवर विश्वास ठेवला असेल, तर आम्ही त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी काम करू” असं त्यांनी म्हटलं होतं.

तर, माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांना केंद्रीय कॅबिनेटमध्ये स्थान दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही.