मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे २० वर्षांच्या विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सासऱ्याने बलात्कार केल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप असून पतीने आणि सासूने या प्रकरणाची बाहेर वाच्यता करु नये यासाठी तिला धमकावल्याचे पीडितेच्या कुटुंबीयांनी तक्रारीत म्हटले आहे.

भोपाळमधील नरसिंगपूर येथे राहणाऱ्या २० वर्षांच्या तरुणीचे जूनमध्ये बजारिया कॉलनी येथे राहणाऱ्या तरुणाशी लग्न झाले होते. लग्नाच्या काही दिवसांनंतर सासऱ्याने पीडितेवर बलात्कार केला. हा प्रकार पीडितेने आधी सासूला सांगितला. सासूने या प्रकरणाची बाहेर वाच्यता करु नकोस, अशी धमकी तिला दिली. यानंतर पीडितेने पतीलाही हा प्रकार सांगितला. पतीने तिची साथ देण्याऐवजी ‘या घरात राहायचे असेल गप्प बसायचं’, असे तिला सांगितले. हा सर्व प्रकार पीडितेला असह्य झाला.

काही दिवसांपूर्वी पीडित तरुणी माहेरी परतली. घरात कोणीही नसताना तिने पतीला फोन केला. मी आत्महत्या करतेय असे तिने पतीला सांगितले. त्यावर पतीने ‘तू आत्महत्या करु शकतेस’, असे सांगितले. शेवटी निराश झालेल्या तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी आता पोलिसांकडे तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.