अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन व उप राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी सोमवारी अमेरिकेतील करोना संदर्भातील टास्क फोर्सची निर्मिती केली. विशेष म्हणजे या टास्क फोर्सचे नेतृत्व करण्यासाठी नेमण्यात आलेल्या तीन सह अध्यक्षांमध्ये एका भारतीय वंशाच्या समावेश आहे.
करोना टास्क फोर्सचे नेतृत्व करण्याची जबाबदारी तीन सह अध्यक्षांवर असणार आहे. ज्यामध्ये डॉक्टर विवेक मूर्ती यांच्यासह येल विद्यापीठातील औषधी विभागाचे सहयोगी प्राध्यापक मार्सेला नुनेझ-स्मिथ व अन्न व औषध प्रशासन विभागचे माजी आयुक्त डेव्हिड केसलर यांचा समावेश आहे.
करोना टास्क फोर्समधील १३ सदस्यांच्या नावांची घोषणा आज करण्यात आली आहे. यामध्ये प्रख्यात आरोग्य तज्ज्ञांचा समावेश आहे.
राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी शनिवारी रात्री डेलावेयरच्या विलमिंगटनमध्ये आपल्या विजयाच्या भाषणात म्हटलं होतं, “आम्ही कोविड संदर्भातील योजनांच्या मदतीसाठी आणि २० जानेवारी २०२१ पासून याच्या अंमलबजावणीसाठी आघाडीच्या वैज्ञानिक आणि विशेषज्ञांच्या गटाची घोषणा करणार आहोत.” मात्र, या टास्क फोर्सचं नेतृत्व कोण करेल याची माहिती बायडन यांनी तेव्हा दिली नव्हती.