स्थलांतरित लोकांनी अमेरिकेत मोठे योगदान दिले आहे, गुगलचे प्रमुख सुंदर पिचाई हे त्याचे उदाहरण आहेत असे अमेरिकी काँग्रेस सदस्या प्रमिला जयपाल यांनी सांगितले, पिचाई व आपण भारतातील एकाच राज्यात जन्माला आलो याचा आनंदच आहे असेही त्या म्हणाल्या.

जयपाल व पिचाई हे दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रात प्रतिष्ठेच्या व उच्च पदावर आहेत. दोघेही तामिळनाडूत जन्मलेले आहेत. गुगलचे प्रमुख सुंदर पिचाई यांची सुनावणी अमेरिकी काँग्रेसच्या समितीसमोर मंगळवारी झाली त्यावेळी श्रीमती जयपाल यांनी पिचाई यांचे कौतुक केले.

जयपाल म्हणाल्या की, तुम्ही भारतातील ज्या राज्यात जन्मलात त्याच राज्यात मीही जन्मले आहे. गुगलचे तुम्ही प्रमुख आहात याचाही अभिमान वाटतो.

पिचाई हे चेन्नईत जन्मलेले असून आयआयटी खरगपूरचे पदवीधर आहेत.  ते २००४ मध्ये गुगल कंपनीत दाखल झाले नंतर २०१५ मध्ये ते याच कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. जयपाल या चेन्नईत जन्मलेल्या असून त्या अमेरिकेत विद्यार्थी म्हणून आल्या. ए १ बी व्हिसा व ग्रीन कार्ड यातून दोघांनाही जावे लागले आता ते अमेरिकेचे नागरिक आहेत.  प्रमिला जयपाल यांनी सुनावणीत पिचाई यांना प्रश्न विचारले. म्यानमारमधील रोहिंग्या पेचप्रसंगात जो वंशसंहार झाला त्याला समाजमाध्यमे जबाबदार आहेत, हा संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क आयोगाचा निष्कर्ष तुम्हाला योग्य वाटतो काय, या प्रश्नावर पिचाई यांनी सांगितले की, आम्ही द्वेषमूलक वक्तव्ये किंवा भाषा याबाबत जबाबदारीचे पालन करतो. द्वेषमूलक भाषेने हिंसाचार पसरतो हे आम्ही स्पष्ट केले आहे.