बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा अद्याप झाला नसला, तरी आरोपप्रत्यारोपांची रणधुमाळी सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय जनता दल, भाजपा, काँग्रेस, संयुक्त जनता दल यांच्यात शाब्दिक युद्ध जोर धरू लागलं आहे. महाआघाडीनं जागांची घोषणा केली असून, भाजपाचे नेते व बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला होता. अखेर महाआघाडीतील जागा वाटपाचा पेच सुटला आहे. राष्ट्रीय जनता दल १४४, तर काँग्रेस ७० जागा लढवणार आहे. तसेच, महाआघाडीतील डावी आघाडी २९ मतदारसंघातून लढणार असल्याचं निश्चित झालं आहे.

महाआघाडीनं जागावाटपांची घोषणा केल्यानंतर बिहारचे उपमुख्यमंत्री व भाजपाचे नेते सुशील कुमार मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. सुशील कुमार मोदी यांनी एक ट्विट केलं आहे. “काँग्रेस आता डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार पटेल आणि जगजीवन राम यांची पार्टी राहिलेली नाही. ती आता राहुल गांधी यांना पंतप्रधान व तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी काम करणारी पीआर कंपनी झाली आहे. या पीआर कंपनीचा खर्च चिनी देणग्या, मनी लाँडरिंग ते तिकीटं विकण्याच्या कामातून चालतो आहे,” अशी टीका सुशील कुमार मोदी यांनी केली आहे.

बिहार विधानसभेची निवडणूक २८ ऑक्टोबर आणि ३, ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून, १० नोव्हेंबर रोजी निकाल घोषित होणार आहे. देशात करोना संकट असताना ही देशातील पहिली विधानसभा निवडणूक आहे. विधानसभा निवडणुकीत जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी आहे.