बिहारमध्ये विधानसभेच्या १० जागांसाठी उद्या पोटनिवडणूक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव अद्यापही राज्यावर आहे की लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांनी दावा केल्याप्रमाणे आघाडीच्या विजयाचे सूत्र खरे ठरणार आहे, हे या निवडणुकीवरून स्पष्ट होणार आहे.
बिहारमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहात आहेत हेही या पोटनिवडणुकीवरून स्पष्ट होणार आहे. आपले अस्तित्व टिकविण्यासाठी लालूप्रसाद आणि नितीशकुमार यांनी दहा मतदारसंघ अक्षरश: पिंजून काढले आहेत. एनडीएच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याबाहेरील कोणताही नेता आला नसला तरी राज्य भाजपचे नेते आणि रामविलास पासवान, उपेंद्र कुशवाह यांनी मतदारसंघात जोर लावला आहे. या पोटनिवडणुकीसाठी एकूण ९४ उमेदवार रिंगणात आहेत.