बिहारमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून पहिल्या टप्प्यातील मतदानही पार पडलं आहे. मात्र इतर टप्प्यांमधील मतदान आणि प्रचारसभा अद्याप सुरुच आहेत. मतदारांना साद घालण्यासाठी नेते मंडळी दिवसरात्र एक करत आहेत. राष्ट्रीय जनता दलचे नेते तेजस्वी यादवही अनेक ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. एकाच दिवशी राज्यातील वेगवगेळ्या भागांमध्ये प्रचारसभा असल्याने तेजस्वी यादव अनेक ठिकाणी हेलिकॉप्टरनेच जात आहेत. निवडणुक प्रचारादरम्यान तेजस्वी यादव यांना व्हाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. मात्र त्यांना पुरवण्यात आलेल्या या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा प्रकार नुकताच समोर आला आहे. तेजस्वी यादव हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर अचानाक त्यांच्या हेलिकॉप्टरच्या आजाबाजूला सभेला आलेल्या समर्थकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळालं. अनेकजण केवळ हेलिकॉप्टरबरोबर स्वत:चा सेल्फी काढण्यासाठी त्याभोवती गोळा झाले होते.

तेजस्वी यांच्या हेलिकॉप्टरजवळ गर्दी गोळा होण्याचा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. याचवरुन आता राष्ट्रीय जनता दलाने तेजस्वी यांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रकरणामध्ये आरजेडीने निवडणुक आयोगाकडेही अर्ज केला असून सुरक्षेसंदर्भातील चिंता व्यक्त केली आहे. आरजेडीच्या ट्विटर हॅण्डलवरुनही तेजस्वी यांच्या हेलिकॉप्टरभोवतीच्या गर्दीचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या गर्दीमध्ये करोनाच्या नियमांचे उल्लंघन केलं जात असल्याचं दिसत आहे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियमही मोडल्याचे दिसत आहे.

“एकीकडे बिहार पोलीस आपल्या राजकीय नेतृत्वाला खुश करण्यासाठी निर्दोष नागरिकांवर मुंगेरी येथे गोळीबार करताना जराही विचार करत नाहीत. तर दुसरीकडे विरोधक असणारे नेते तेजस्वी यादव यांना एवढी दुबळी सुरक्षा दिली आहे की कोणीही आरामत हेलिकॉप्टरपर्यंत पोहचू शकतं,” अशा कॅप्शनसहीत आरजेडीने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हा व्हिडीओ तेजस्वी यांच्या समस्तीपुर जिल्ह्यातील उजियारपुरमधील प्रचारसभेनंतरचा आहे. व्हिडिओमध्ये तेजस्वी यादव हे हेलिकॉप्टरच्या दिशेने चालताना दिसत असून अचानक त्यांच्या आजुबाजूला गर्दी जमा होत असल्याचे दिसते. पाहता पाहता हेलिकॉप्टरच्या चारही बाजूने लोकांची गर्दी जमा होते आणि पोलीस तसेच सुरक्षारक्षकांनाही यासंदर्भात काहीच करता येत नसल्याचेही व्हिडीओतील दृष्यांमध्ये दिसत आहे.