बिहारमधील विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्ष जरी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्र पक्षासोबत लढवत असला, तरी या निवडणुकीत पक्षाला स्वबळावर बिहारमध्ये सत्तेत यायचे आहे. त्यासाठीच पक्षाने विधानसभेच्या १६० जागांवर निवडणूक लढविण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे मित्र पक्षांनीही या मागणीला होकार दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बिहारमधील निवडणुकीमध्येही भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचाच वापर करणार आहे. त्यामुळे जागावाटपात पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाल्याच पाहिजेत, अशी भाजपच्या नेत्यांची अपेक्षा आहे. त्यांनी मित्रपक्षांनाही याबद्दल माहिती दिली आहे. १६० जागा लढविल्यास पक्ष स्वबळावर सत्तेत येण्याची शक्यता जास्त असल्याने भाजपने तेवढ्या जागांवर कायम राहण्याचे ठरविले असल्याचे समजते.
दरम्यान, जदयू, राजद आणि कॉंग्रेस आघाडीचे जागावाटप जाहीर झाले तरी अजून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे जागावाटप जाहीर झालेले नाही. त्यामुळे लोक जनशक्ती पक्ष, राष्ट्रीय लोकसमता पक्ष आणि हिंदुस्तानी अवामी मोर्चा सेक्युलर या पक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. भाजप अध्यक्ष अमित शहा आणि या तिन्ही पक्षाच्या प्रमुखांची एक बैठक ३१ ऑगस्ट रोजी झाली होती. मात्र, त्यामध्ये जागावाटपाबाबत अंतिम निर्णय झाला नाही.