बिहारमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे, अररिया, पूर्णिया आणि किशनगंज भागांसह कटिहारचाही काही भाग पाण्याखाली गेला आहे. तसंच चम्पारण्य, पश्चिमी चम्पारण्य हे भागही पाण्याखाली गेले आहेत, बिहारच्या उत्तर भागात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे, त्यामुळे पूर आला आहे. तसंच या पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक घरं आणि गाड्याही पाण्यात बुडाल्या आहेत. या सगळ्या परिस्थितीतून दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारनं मदत करावी असं मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटलं आहे.

एनडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आलं असून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. पूरग्रस्त लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचं कामही युद्धपातळीवर सुरू आहे. या सगळ्या पूरस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि संरक्षणमंत्री अरूण जेटली यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. बिहारच्या पूरस्थितीमुळे या ठिकाणी एनडीआरएफच्या अतिरिक्त तुकड्या, सैन्यदल आणि वायुसेना यांनी मदतीसाठी यावं अशीही मागणी नितीशकुमार यांनी केली आहे.

पूर्णिया भागात पुराची स्थिती अत्यंत गंभीर आहे, या भागातल्या लोकांना अन्नाची पाकिटं पुरविण्यात आली आहेत. नेपाळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि बिहारमध्ये पडत असलेल्या पावसामुळे ही पूरस्थिती निर्माण झाली आहे.महानंदा नदीला पूर आला आहे तर गंडक नदीतून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येतो आहे त्यामुळे या आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. या पावसाचा परिणाम रेल्वे सेवेवरही झाला आहे. अनेक एक्स्प्रेस ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत अशी माहितीही नितीशकुमार यांनी दिली आहे. तसंच केंद्रानं तातडीची मदत करावी अशीही मागणी केली आहे.