बिहार हे एक मागास राज्य असून त्याला विशेष राज्याचा दर्जा मिळायलाच हवा, सरकारने आमच्या या मागणीचा जरुर विचार करावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान यांनी केली आहे. यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी देखील ही मागणी लावून धरली होती. विशेष म्हणजे बिहारचे हे दोन्ही नेते सध्या एनडीएचा भाग आहेत. बिहारच्या विशेष दर्जाची त्यांनी मोदी सरकारकडे मागणी केली आहे.



भाजपा
अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबर अनुसुचित जाती-जमाती कायदा अर्थात अट्रॉसिटी अॅक्ट आणि सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण यासंदर्भात झालेल्या चर्चेनंतर पासवान यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पासवान म्हणाले, केंद्र सरकारने अॅट्रॉसिटी अॅक्टबाबत सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. सध्या कोर्टाला सुट्टी असल्याने यासंदर्भात विशेष अध्यादेश काढण्याची मागणी आम्ही केली आहे. त्याचबरोबर सरकारी नोकऱ्यांमध्ये पदोन्नतीसाठीच्या आरक्षणाच्या अध्यादेशाचीही मागणी आम्ही केली आहे. आमच्या या मागणीवर अमित शहा सहमत झाले आहेत. त्यामुळे लवकरच यावरही निर्णय घेण्यात येईल, असे पासवान यांनी सांगितले.