बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे आरोग्य खात्याचा कारभार असताना रुग्णालयांसाठी १०० कोटी रुपयांची औषधे खरेदी करण्यात आली त्याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी बिहार विधानसभेत बुधवारी विरोधकांनी केली त्यामुळे सभागृहात गदारोळ माजला.
सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते नंदकिशोर यादव यांनी विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांचे लक्ष सभा तहकुबीच्या नोटिशीकडे वेधले. सभागृहासमोरील अन्य कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी पक्षाच्या आमदारांनी औषध घोटाळ्याबाबत दिलेल्या सूचनेवर चर्चा करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली.
त्यानंतर भाजपच्या सदस्यांनी सभागृहातील मोकळ्या जागेत धाव घेऊन सरकारविरोधी घोषणाबाजी केली. जद(यू)च्या ज्या आठ बंडखोर आमदारांना न्यायालयाने सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्याची अनुमती दिली ते आमदारही भाजपच्या सदस्यांसमवेत सभागृहातील मोकळ्या जागेत आले आणि त्यांनी फलक फडकाविले. त्यामुळे अध्यक्षांनी कामकाज तहकूब केले.
राज्यातील रुग्णालयांसाठी औषधांची खरेदी करण्यात आली त्याच्या सीबीआय चौकशीपासून सरकार दूर पळत आहे, असे विरोधी पक्षनेत्यांनी वार्ताहरांना सांगितले. जद(यू) पूर्वीच्या आघाडीतून बाहेर पडल्यानंतर १०० कोटी रुपयांची औषधे खरेदी करण्यात आली त्या घोटाळ्यात सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले, असे नंदकिशोर यादव म्हणाले.