हिमाचल प्रदेशमधील एका खाणीच्या काम सुरू असलेल्या बोगद्यामध्ये मागील ९ दिवसांपासून अडकलेल्या कामगारांपैकी दोघांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. आणखी एक कामगार बोगद्यामध्ये अडकला आहे.
बोगद्याचे काम चालू असताना मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने तीन कामगार त्यात अडकले होते. त्यांच्याजवळील अन्न संपल्याने नऊ दिवस कामगारांना उपाशीपोटी काढावे लागले. सोमवारी सकाळी अखेर दोन कामगारांना बोगद्यातून बाहेर काढण्यात यश आल्याचे बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दोघांचीही प्रकृती चांगली असून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, तिसऱ्या कामगाराचा शोध सुरू आहे. या कामगाराचे नाव हृदय राम असून त्याच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याचे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ)चे महासंचालक ओ. पी. सिंग यांनी सांगितले. सिंग हे बचाव कार्यावर दिल्ली येथून लक्ष ठेवून आहेत. कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी एनडीआरएफचे ४५ कर्मचारी काम करत आहेत.