सिएटल : दी मायक्रोसॉफ्ट कार्पोरेशनचे संस्थापक बिल गेट्स व त्यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स यांनी २७ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर घटस्फोटाचा निर्णय  घेतला आहे. घटस्फोट झाल्यानंतरही हे दोघे बिल व मेलिंडा गेट्स फाउंडेशनसाठी एकत्र काम करणार आहेत.

दोघांनीही साधारपणे सारख्याच ट्विट संदेशात म्हटले आहे की, २७ वर्षांनी आम्ही वैवाहिक जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही तीन मुलांचे संगोपन केले,  एका फाउंडेशनची स्थापना केली, जी संस्था जगभरात काम करीत आहे. लोकांच्या आरोग्यासाठी ती संस्था काम करीत आहे. आम्हाला आमच्या कुटुंबासाठी नवीन जीवनाकरिता अवकाश हवा होता, व्यक्तिगतता हवी होती त्यामुळे घटस्फोटाचा निर्णय घ्यावा लागला.

अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस व मँके झी स्कॉट यांचा घटस्फोट २०१९ मध्ये झाला होता. त्यानंतर मँकेझी यांनी पुनर्विवाह केला असून त्यांना अ‍ॅमेझॉनमध्ये ४ टक्के वाटा मिळाला आहे. त्यामुळे त्यांना अंदाजे ३६ अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती मिळाली आहे.

गेट्स यांचा विवाह १९९४ मध्ये हवाई येथे झाला होता. मेलिंडा गेट्स या मायक्रोसॉफ्टमध्ये उत्पादन व्यवस्थापक असताना १९८७ मध्ये त्यांची मेलिंडा यांच्याशी ओळख झाली होती. २०१९ मध्ये मेलिंडा गेट्स यांनी दी मोमेंट ऑफ लिफ्ट या आठवणीपर पुस्तकाचे लेखन केले आहे. त्यात  त्यांनी त्यांचे बालपण, पत्नी म्हणून करावा लागलेला संघर्ष व तीन मुलांचे संगोपन याविषयी लिहिले होते.

सर्वात मोठी समाजसेवी संस्था

बिल गेट्स व मेलिंडा गेट्स फाउंडेशन ही जगातील सर्वात मोठी खासगी समाजसेवी संस्था असून ५० अब्ज  रुपयांच्या देणगीची रक्कम त्यांच्याकडे आहे. जागतिक आरोग्य व विकास या क्षेत्रात ही संस्था काम करते. गेल्याच वर्षी बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या संचालक मंडळातून पायउतार झाले होते. इ.स. २००० पर्यंत ते मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. नंतर त्यांनी २००८ मध्ये कंपनीच्या कारभारातील सहभाग कमी केला होता. त्यांनी ही कंपनी पॉल अ‍ॅलेन यांच्या समवेत १९७५ मध्ये सुरू केली होती. २०१४ पर्यंत ते कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष होते.

संपत्तीच्या वाटणीबाबत उत्सुकता

बिल गेट्स हे काही वर्षांपूर्वी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते व त्यांची संपत्तीही १०० अब्ज डॉलर्सच्या आसपास होती. आता हे दाम्पत्य घटस्फोटानंतर संपत्तीची वाटणी कशी करणार याकडे सर्वाचे लक्ष आहे.