बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या कामाची पाहणी करण्यासाठी सध्या भारत दौऱ्यावर असलेले मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत मोठे विधान केले आहे. भारत वेगाने आर्थिक विकास करण्याची क्षमता असलेला देश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले.

वेगाने आर्थिक विकास साधण्याची क्षमता भारताकडे असून त्याद्वारे भारत गरीबी दूर करु शकेल. भारत आरोग्य आणि शिक्षणात सर्वाधिक गुंतवणूक करु शकतो, असे गेट्स यांनी म्हटले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत सुस्ती असल्याच्या पार्श्वभूमीवर गेट्स यांचे हे विधान महत्वाचे मानले जात आहे.

गेट् पुढे म्हणाले, मला भारतातील सध्याच्या स्थितीची जास्त माहिती नाही. मात्र, मी हे जरुर सांगू इच्छितो की पुढचे दशक निश्चितपणे भारताचेच असेल या काळात भारताची अर्थव्यवस्था वेगाने विकास करेन. भारतामध्ये वेगाने विकास साधण्याची ताकद आहे. प्रत्येकालाच ही आशा असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

भारताची आधार प्रणाली, आर्थिक सेवा तसेच फार्मा क्षेत्राचेही गेट्स यांनी यावेळी कौतुक केले. आधारचे कौतुक करताना ते म्हणाले, भारत हा महत्वपूर्ण देश आहे जिथे अनेक चांगले प्रवर्तक निर्माण होत राहिले आहेत. इथे आधार आणि युपीआयच्या माध्यमातून विविध सेवा पुरवल्या जात आहेत. तसेच याला व्यापक स्वरुपात स्विकारार्हता मिळाली आहे. याचे अनेक आर्श्चर्यकारक परिणाम पहायला मिळाले आहेत.

दरम्यान, गेल्या शुक्रवारीच बिल गेट्स जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. संपत्तीच्या बाबतीत त्यांनी अॅमेझॉनच्या जेफ बेजोस यांनाही मागे टाकले आहे. त्यांची एकूण संपत्ती ११० बिलिअन अमेरिकन डॉलरवर (७.८९ लाख कोटी) पोहोचली आहे. गेट्स यांनी आजवर अनेक देशांमध्ये गरीबी कमी करण्यासाठी, सामाजिक विकासाच्या कार्यक्रमांसाठी बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनला ३५ बिलिअन अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक संपत्ती दान केली आहे.