बिल गेट्स यांच्याकडून समर्थन

केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी जोरदार समर्थन केले आहे. सरकारचा हा धाडसी निर्णय भारताला काळ्या अर्थव्यवस्थेकडून पारदर्शी अर्थव्यवस्थेकडे घेऊन जाणारा आहे, असे मत गेट्स यांनी व्यक्त केले आहे.

नीती आयोगाने आयोजित केलेल्या दुसऱ्या ट्रान्सफॉर्मिग इंडिया व्याख्यानमालेत गेट्स बोलत होते. जनधन, आधार स्टार्ट अप इंडिया, स्वच्छ भारत यांचेही गेट्स यांनी कौतुक केले. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानासमवेतच गेट्स यांनी आर्थिक, सामाजिक बदलांबाबत आपली मते व्यक्तकेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाची त्यांनी या वेळी स्तुती केली. या निर्णयामुळे काळा पैसा हद्दपार होईल आणि त्याचे भविष्यात परिणाम दिसतील, असेही गेट्स म्हणाले. भारताने केवळ अंतर्गत नव्हे तर संशोधनाच्या माध्यमातून जागतिक आव्हानांचा मुकाबला करावा, असेही ते म्हणाले.

भारतातील आरोग्यच्या प्रश्नांचाही गेट्स यांनी उल्लेख केला. आपल्याकडे जादूची कांडी असती तर भारतात केवळ एकाच प्रश्नावर लक्ष केंद्रित केले असते आणि तो प्रश्न म्हणजे कुपोषण, असे ते म्हणाले. भारतातील काही राज्यांनी याबाबत प्रगती केली आहे, मात्र काही प्रदेशांमध्ये कुपोषण हा अद्याप निकषच समजला जातो, अपवाद नव्हे, असेही ते म्हणाले.