केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे माजी अध्यक्ष अमित शाह यांनी मनात आणलं तर शेजारील देशातही सत्ता स्थापन करतील, असं विनोद आपण ऐकले असतील. परदेशात राजकीय घडामोडी सुरू झाल्या की, असे मीम्सही व्हायरल होतात. पण, आता चक्क भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनीच हा दावा केला आहे. अमित शाह यांची शेजारील राष्ट्र असलेल्या नेपाळ आणि श्रीलंकेत सरकार स्थापन करण्याची योजना आहे, असा अचंबित करणारा दावा भाजपाच्या एका मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

वादग्रस्त विधानांमुळे वारंवार चर्चेच्या केंद्रस्थानी येणारे त्रिपुराचे भाजपाचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी हा दावा केला आहे. देव यांनी भाजपाच्या एका कार्यक्रमात हा गौप्यस्फोट केला. त्यामुळे राजकीय वर्तुळातील अनेकांनी भूवया उंचावल्या. त्रिपुराची राजधानी आगरातळा येथे भाजपाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भारताबरोबरच पक्षाचा शेजारील देशांमध्ये विस्तार करण्याची योजना असल्याचं ते म्हणाले.

आणखी वाचा- “भारत मूर्खपणाची रंगभूमी ठरतोय, जर २२ वर्षांची विद्यार्थिनी देशासाठी धोका ठरत असेल तर…”

“नेपाळ आणि श्रीलंकेत भाजपाचं सरकार स्थापन करण्याची केंद्रीय गृहमंत्री यांची योजना आहे. जेव्हा २०१८च्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू होती. त्यावेळी भाजपाने डाव्या आघाडीचा पराभव केला होता. अमित शाह हे त्यावेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात आम्ही बोलत बसलो होतो. भाजपाचे ईशान्येकडील राज्यांचे भाजपाचे सचिव अजय जामवाल म्हणाले होते, ‘भाजपाने जवळपास सर्वच राज्यांमध्ये सरकारं स्थापन केली आहेत.’ त्यावर बोलताना अमित शाह म्हणाले होते,’आता फक्त नेपाळ आणि श्रीलंका राहिले आहेत. आपल्याला नेपाळ आणि श्रीलंकेत पक्षाचा विस्तार करून तेथे भाजपाचे सरकार स्थापन करायचे आहे,’ असं त्यावेळी शाह म्हणाले होते, असा दावा मुख्यमंत्री देव यांनी जाहीर कार्यक्रमात केला.

आणखी वाचा- मोदींचा फोटो आणि भगवद्गीतेची प्रत अंतराळात पाठवणार

“पश्चिम बंगालमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव करेल,” असा विश्वास देव यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाजपाला जगातील सर्वात मोठा पक्ष बनवल्याबद्दल अमित शाह यांचं कौतूकही केलं. भाजपा केरळमध्येही बदल घडवून आणेल, असं ते म्हणाले.