केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि गुजरात या सहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचे शुक्रवारी केंद्र सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. या सहा राज्यांनी कृती योजनांद्वारे प्रादुर्भाव नियंत्रणात आणावा, अशी सूचनाही केंद्र सरकारने केली आहे.

राजधानीतील हस्तसल गावातील डीडीए उद्यानात १६ पक्ष्यांचा अचानक मृत्यू झाल्याचे आढळले असून त्यांचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. केरळच्या दोन बाधित जिल्ह्य़ांमधील कत्तल प्रक्रिया पूर्ण झाली असून तेथे र्निजतुकीकरण सुरू आहे, असे एका अधिकृत निवेदनामध्ये म्हटले आहे. ज्या राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झालेला नाही त्यांना, पक्ष्यांचा अचानक मृत्यू झाल्याचे आढळल्यास त्याची त्वरित माहिती द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. केरळ, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या बाधित राज्यांमध्ये केंद्राची पथके पाठविण्यात येणार आहेत.
हरयाणातील पंचकुला जिल्ह्य़ात काही पक्ष्यांचे नमुने घेतले असता बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न झाल्याने एक लाख ६० हजार कोंबडय़ांची कत्तल करावी लागणार आहे, असे राज्याचे कृषी मंत्री जे.पी. दलाल यांनी सांगितले.

केरळमधून येणाऱ्या कोंबडय़ांवर बंदी

दक्षिण कन्नड जिल्ह्य़ात केरळमधून येणाऱ्या कोंबडय़ांवर बंदी घालण्यात आल्याची माहिती जिल्ह्य़ाच्या उपायुक्तांनी दिली आहे. केरळातून आधी ज्या वाहनांनी कोंबडय़ा आणण्यात आल्या ती वाहने र्निजतुक करण्यात येणार आहे. छत्तीसगडमधील बलोड जिल्ह्य़ात चार कावळे मृतावस्थेत सापडले असून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.