भारतीय हवाईदल प्रमुख बी. एस. धनोआ यांचा दावा

भारतीय हवाईदल चीनपेक्षा अधिक सुसज्ज असून, त्यांच्याकडून होणाऱ्या कोणत्याही हल्ल्यास प्रतिकार करण्यासाठी सक्षम असल्याचे भारतीय हवाईदल प्रमुख एअर मार्शल बी. एस. धानोआ यांनी म्हटले आहे. हलवारा हवाई तळावर आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. देशाला भेडसावणाऱ्या कोणत्याही सुरक्षा समस्येला सामोरे जाण्यासाठी हवाईदल तयार असल्याचे त्यांनी म्हटले.

आहे त्या साधनसामग्रीनिशी, अल्पावधीची आगाऊ सूचना मिळालेली असताना त्वरित कारवायांसाठी हवाई दल तयार असल्याचे धानोआ यांनी गेल्या वर्षी म्हटले होते. मात्र हवाई दलाचा सध्याचा संरक्षण खर्च पुरेसा आहे काय, संसदीय स्थायी समितीने यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते असा प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर आम्ही या संदर्भातील खर्चाचा तपशील सरकारकडे पाठवला आहे, असे त्यांनी सांगितले.

चीनने आपल्या हवाई दलामध्ये जे-२० सारखे विमान दाखल केले आहे, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी काय पावले उचलण्यात आली आहेत, असे विचारण्यात आल्यानंतर धानोआ यांनी भारतीय हवाई दलाकडे शक्तिशाली रडार असून ती अतिशय सहजतेने अशा विमानांना मात देऊ शकतात असे सांगितले. भारतीय हवाई दलास अत्याधुनिक विमानांसह लष्करी सामान आणि तरुण कर्मचाऱ्यांसह नवे रूप देण्यात येत आहे. यामुळे भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हवाई तळांचा लष्कर आणि नागरी या दोन्ही वापरास हवाई दलास कोणताही आक्षेप नाही. अशाप्रकारे जम्मू, पठाणकोट, बठिंडा या ठिकाणी असा वापर करण्यात येत आहे. हलवारा या ठिकाणीही असा वापर होण्यास कोणतीही समस्या नाही. स्थानिक पोलीस वाणिज्यिक उड्डाणांच्या सुरक्षा व्यवस्थेची देखभाल करतील.