लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यात आज पुन्हा एका घटनेची भर पडली आहे. रोड शो पूर्वीच इथे सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले मोदी-शाहंची पोस्टर्स तृणमुलच्या कार्यकर्त्यांनी हटवली. त्यामुळे टीएमसी आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


या घटनेबाबत भाजपाने तृणमुलचे कार्यकर्ते आणि पोलिसांवर आरोप केले आहेत. भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय म्हणाले, ममतांच्या गुंडांनी आणि पोलिसांनी रोड शो पूर्वीच मोदी-शाहंचे सर्व पोस्टर्स आणि भाजपाचे झेंडे काढून टाकले. आम्ही तिथे पोहोचताच ते सर्वजण पळून गेले. तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी या कृत्याला लोकशाही हत्या संबोधले आहे. ममतांकडून सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोपही भाजपाने केला आहे.

बंगालमध्ये आत्तापर्यंत सहा टप्प्यात मतदान झाले आहे. या सर्व टप्प्यांमध्ये इथे मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आमि हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. आज (दि.१४) भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शोचे कोलकातामध्ये आयोजन करण्यात आले होते. मात्र, हा रोड शो होण्यापूर्वीच त्यांची सर्व पोस्टर्स उतरवण्यात आली आहेत. यानंतर कोलकातामध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, १५ मे रोजी बंगालमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या निवडणूक रॅलीचे हावडामध्ये आयोजन करण्यात आले होते. मात्र, ही रॅली रद्द करण्यात आली होती. त्याचबरोबर भाजपाचे उमेदवार भारती घोष आणि बाबूल सुप्रियो यांच्या वाहनांवर दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. यापूर्वी अमित शाह यांना जाधवपूरमधील बरुईपूर येथे हेलिकॉप्टरने उतरण्यास मनाई करण्यात आली होती.