झारखंडमध्ये निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. यानंतर सध्या राज्यात राजकीय वातारण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने ८१ पैकी ५२ मतदारसंघातील उमेदावारांची घोषणा केली आहे. भाजपाकडून उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरीत मतदारसंघातील उमेदवारांची यादी देखील लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती आहे.

याचबरोबर काँग्रेसकडूनही पाच मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून पाच जणांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. झारखंड काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर ओरावण लोहर्दगा येथून निवडणूक लढवणार आहेत.

झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास हे जमशेदपूर(पूर्व) येथून तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण गिलुवा चक्रधरपूरमधून निवडणूक लढवणार आहेत.
झारखंडमध्ये ८१ विधानसभा मतदारसंघासाठी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ डिसेंबरला मतमोजणी असणार आहे. राजकीय पक्षांना बहुमतासाठी ४१ चा आकडा पार करावा लागणार आहे.

निवडणुकीचा दुसरा टप्पा ७ डिसेंबर, तिसरा टप्पा – १२ डिसेंबर, चौथा टप्पा – १६ डिसेंबर आणि शेवटचा पाचवा टप्पा २० डिसेंबर रोजी पार पडणार आहे. २०१४ मध्ये झारखंडमध्ये चार टप्प्यात निवडणूक पार पडली होती, तेव्हा भाजपाला सर्वाधिक ३७ जागा मिळाल्या होत्या. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२० संपुष्टात येणार आहे. झारखंडमधील एकूण मतदारांची संख्या २.२६ कोटी आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी पत्रकारपरिषदेद्वारे याबाबत माहिती दिली आहे. झारखंडमधील ८१ मतदारसंघापैकी ६७ मतदारसंघ हे नक्षलग्रस्त आहेत. शिवाय १९ जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे. झारखंडमध्ये पहिल्यांदाच दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना घरी बसून पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करता येणार आहे. त्यांना घराशेजारी ईव्हीएमवर जाऊन मतदान करायचे नसेल तर पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याचा पर्याय त्यांना देण्यात आला आहे.

निवडणूक आयोग झारखंडबरोबरच दिल्ली विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम देखील घोषित करले, असे वाटत होते . मात्र आयोगाने केवळ झारखंडच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ २२ फेब्रुवारी २०२० रोजी संपुष्टात येणार आहे.