पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला येत्या २६ मे रोजी सत्तेवर येऊन दोन वर्षे पूर्ण होणार असून त्यानिमित्त एक महिनाभर प्रचारमोहीम हाती घेण्यात येणार आहे. दोन वर्षांच्या कालावधीत सरकारने केलेल्या कामगिरीची जनतेला माहिती देण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री आणि खासदारांवर सोपविण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर जनतेसाठी केलेल्या उपाययोजनांमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांनी संसदेत कशा प्रकारे अडसर निर्माण केला त्याचीही जनतेला माहिती देण्यात येणार आहे.

भाजप संसदीय पक्षाची बैठक मंगळवारी पार पडली. त्यामध्ये मोदी यांनी १९७५ मध्ये देशात लादण्यात आलेल्या आणीबाणीचा मुद्दा उपस्थित केला.

तरुण पिढीला आणीबाणीबाबत अवगत करावे आणि लोकशाही चिरडून टाकण्याचे प्रयत्न कसे करण्यात आले आणि त्यामागे कोणाचा हात होता तेही तरुण पिढीला सांगावे, अशी सूचना मोदी यांनी पक्षाच्या खासदारांना केली आहे.

या बैठकीत मोदी यांनी रालोआ सरकारच्या दोन वर्षांच्या कारकीर्दीबाबत भाष्य केले. सर्व मंत्र्यांनी देशभरातील २०० प्रमुख ठिकाणांचा दौरा करून जनतेला सरकारच्या कामगिरीची माहिती द्यावी, असे मोदी यांनी या वेळी सांगितल्याचे संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव प्रताप रूडी यांनी वार्ताहरांना सांगितले.