नोटाबंदीच्या निर्णयाचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवा, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या खासदारांना दिले आहेत. ‘शनिवारी आणि रविवारी दिल्लीत न थांबता आपल्या मतदारसंघात जाऊन सरकारच्या निर्णयाची माहिती लोकांना द्या’, अशा सूचना मोदींनी भाजपच्या खासदारांना दिले आहेत.

नोटाबंदीच्या निर्णयामुळे विरोधकांनी संसदेचे कामकाज चालू दिलेले नाही. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये नोटाबंदीवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना नामोहरम केले आहे. याच पार्श्वभूमीवरुन मोदींनी सर्व खासदारांना आपापल्या मतदारसंघात जाऊन जनतेशी संवाद साधण्याच्या सूचना केल्या आहेत.

नोटा बदलण्यासाठी रांगेत उभ्या असणाऱ्या लोकांना मदत करण्याच्या सूचना भाजपकडून खासदारांना देण्यात आल्या आहेत. ‘खासदारांनी मतदारसंघात जाऊन लोकांशी संवाद साधा. नोटाबंदीच्या निर्णयाबद्दल लोकांच्या मनात शंका आहेत. लोकांच्या मनातील शंकांचे निरसन करा. यासाठी प्रसारमाध्यमे आणि समाज माध्यमांचा वापर करा. नोटाबंदीचे सकारात्मक परिणाम आणि फायदे लोकांपर्यंत पोहोचवा,’ असे निर्देश भाजपच्या खासदारांना देण्यात आले आहे.

विरोधकांकडून होणाऱ्या टिकेला आक्रमकपणे सामोरे जाण्याच्या सूचना भाजप खासदारांना देण्यात आल्या आहेत. एटीएम आणि बँकांबाहेर उभ्या असलेल्या लोकांना सरकारच्या निर्णयाची पूर्ण माहिती द्या, त्यांना मदत करा, असे भाजपकडून खासदारांना सांगण्यात आले आहे.

नोटाबंदीचा निर्णय आणि त्यामुळे करावा लागणारा अडचणींचा सामना यांचा रोष कमी करण्यासाठी भाजपने खासदारांना पाचारण केले आहे. ‘रिझर्व्ह बँक आणि अर्थ मंत्रालयाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा. सरकारने काळ्या पैशांविरोधात ठोस पाऊल उचलले आहे. यामुळे काळा पैसा रोखला जाणार आहे, ही सर्व माहिती लोकांना द्या,’ अशा सूचना भाजप आणि मित्रपक्षांच्या खासदारांना देण्यात आल्या आहेत.