भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे अडचणीत सापडलेले बिहारचे उपमुख्यमंत्री पूत्र तेजस्वी यादव यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. २००४ मध्ये मी १३-१४ वर्षांचा होतो, मला मिसरुडही फुटलं नव्हतं, मग मी भ्रष्टाचार कसा करेन असा सवाल तेजस्वी यादव यांनी विचारला आहे. आमची आघाडी अभेद्य असून आम्ही भाजपला सडेतोड प्रत्युत्तर देऊ असा इशाराच त्यांनी दिला.

गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्यात कुरबूर सुरु असल्याची चर्चा होती. यात भर म्हणजे लालूप्रसाद यादव, त्यांचे पुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याविरोधात सीबीआयने कारवाई केली आहे. गुन्हा दाखल झाल्याने तेजस्वी यादव यांनी राजीनामा देण्याची मागणी जोर धरत होती. नितीश कुमार यांनीदेखील राजदला चार दिवसांचे अल्टिमेटम दिले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी तेजस्वी यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. राजीनामा देणार नसल्याचे संकेतच त्यांनी दिले.

मी मंत्री झाल्यापासून भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. माझ्या अंतर्गत येणाऱ्या तीन खात्यांमध्ये भ्रष्टाचाराचे एकही प्रकरण समोर आलेले नाही असा दावा तेजस्वी यादव यांनी केला. २००४ मध्ये मी १३-१४ वर्षांचा होता. मग मी भ्रष्टाचार कसा करणार असा सवाल त्यांनी विचारला. माझ्याविरोधात दाखल झालेला गुन्हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. लालूप्रसाद यादव यांच्यासोबतच त्यांचा २८ वर्षांचा मुलगाही वरचढ चढत असल्याने आमच्यावर कारवाई होत असल्याचा दावा त्यांनी केला. माझ्याविरोधात दाखल झालेला गुन्हा हा राजकीय षडयंत्राचा भाग आहे. अमित शहा आणि नरेंद्र मोदींनीच हे षडयंत्र रचले असून त्यांना आता माझी भीती वाटू लागली आहे. सुरुवातीपासूनच भाजपला महाआघाडी फोडायची होती. याशिवाय प्रत्येक गुन्ह्यात बिहारचे नाव घेऊन त्यांना बिहारची प्रतिमा मलिन करायची होती असा आरोप त्यांनी केला. आम्ही भाजपला सडेतोड उत्तर देऊ, त्यांना आमच्या राज्यात थारा देणार नाही असा निर्धारच त्यांनी व्यक्त केला.