पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कानपूरमध्ये सभा घेणार आहेत. यासाठी भाजपकडून त्यांची लकी खुर्ची तयार केली जाते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कानपूरमध्ये आल्यावर लकी खुर्चीवर बसावे, अशी भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कानपूरच्या सभेसाठी तयार करण्यात येणारी खुर्ची नरेंद्र मोदींसाठी अत्यंत लाभदायी असल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लकी खुर्चीचा वापर केल्यास पक्षाला उत्तर प्रदेशातील निवडणुकीत मोठे यश मिळेल, अशी आशा भाजप कार्यकर्त्यांना आहे.

कानपूरमधील सभेसाठी तयार केल्या जाणाऱ्या खुर्चीचे काही किस्से भाजप कार्यकर्त्यांकडून सांगितले जातात. ‘नरेंद्र मोदींनी पंतप्रधान होण्याआधी सर्वात पहिली विजय शंखनाद रॅली १९ ऑक्टोबर २०१३ रोजी कानपूरमध्ये केली होती. या रॅलीदरम्यान मोदी याच खुर्चीवर बसले होते. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार झाल्यानंतरची मोदींची ती पहिलीच रॅली होती. यानंतर भाजपने लोकसभा निवडणुकीत ८० पैकी ७१ जागा जिंकल्या. तेव्हापासून ही खुर्ची मोदींसाठी लकी समजली जाते,’ अशी माहिती भाजपच्या कार्यकर्त्यांकडून दिली आहे.

कानपूरमधील भाजप नेत्यांनी नरेंद्र मोदींसाठी लाभदायी ठरणारी खुर्ची सांभाळून ठेवली आहे. गेल्या तीन वर्षांपासून मोदींची खुर्ची पक्षाच्या जिल्हा कार्यालयात ठेवण्यात आली आहे. याशिवाय मोदी रॅलीदरम्यान ज्या ग्लासातून पाणी प्यायले, तो ग्लासदेखील जपून ठेवण्यात आला आहे. यासोबतच एक डबाही सांभाळून ठेवण्यात आला आहे. यामध्ये मोदींना भेच देण्यात आलेले लाडू ठेवण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानपूरमधील सभेच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी खुर्चीची सफाई केली आहे. या खुर्चीला पॉलिशदेखील करण्यात आले आहे. ‘पंतप्रधान झाल्यानंतर मोदी पहिल्यांदाच कानपूरमध्ये येत आहेत. मोदींसाठी खुर्ची लकी असल्याचे कार्यकर्ते मानतात. मोदींनी लोकसभा निवडणुकीच्यावेळी या खुर्चीचा वापर केला होता. त्या निवडणुकीत भाजपने शानदार विजय मिळवला होता. त्यामुळे मोदींनी २०१७ मध्ये होणाऱ्या परिवर्तन रॅलींमध्येही याच खुर्चीचा वापर केल्यास विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळेल,’ असे भाजपचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र मैथानी यांनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदींच्या लोकसभा निवडणुकीतील विजयात उत्तर प्रदेशाचा मोठा वाटा आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशात ७१ जागा जिंकल्या होत्या. याशिवाय मित्रपक्षाच्या साथीने एकूण ७३ जागांवर विजय मिळवत दिल्ली काबीज केली होती. आता उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत मोदींची लकी खुर्ची भाजपला मुख्यमंत्र्यांची खुर्ची मिळवून देणार का, हे पाहणे महत्त्वपूर्ण असणार आहे.