भाजपाने आज 12 तासांच्या बंगाल बंदची घोषणा दिली आहे. इस्लामपूर परिसरात शिक्षकांच्या नियुक्तीविरोधात आंदोलन करताना झालेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान बंद सुरळीत पार पडावा यासाठी तृणमूल काँग्रेसने कंट्रोल रुम्स उभे केले असून रस्त्यांवर जवळपास चार हजार पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आलं आहे. राज्य शिक्षण मंत्री पर्था चॅटर्जी यांनी भाजपा विकास रोखण्यासाठी बंद पुकारत असल्याचा आरोप केला आहे.

‘बंद दरम्यान कोणी हिंसाचार करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर पोलीस कडक कारवाई करतील. पक्ष कार्यकर्त्यांनाही अलर्ट राहण्यास सांगण्यात आलं असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. कोणी उकसवण्याचा प्रयत्न केल्यास त्यावर प्रतिक्रिया देऊ नका असंही सांगण्यात आलं आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यास पोलिसांना कारवाई कऱण्याचा आदेश देण्यात आला आहे’, असं त्यांनी सांगितलं आहे.

दुसरीकडे भाजपाने राज्य सरकार जाणुनबुजून हा बंद हाणून पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही काळापासून भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये तणाव आहे. दरम्यान आंदोलनाला सुरुवात झाली असून नादनघाट परिसरात भाजपा कार्यकर्त्यांनी रेल्वे रोखली. यावेळी काही गाड्याही रोखण्यात आल्या.

कूचबिहार येथे समर्थकांनी सरकारी बसची तोडफोड केली आहे. अनेक ठिकाणी ट्रेन्स रोखण्यात आल्या असून सरकारी बसेसना आग लावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मिदनापूर येथे सरकारी बसला आग लावण्यात आली.

भाजपा नेता राहुल सिन्हा यांनी म्हटलं आहे की, राज्य सरकारने राज्यघटनेचा अपमान केला असून त्याविरोधातच हा बंद पुकारण्यात आला आहे. आम्हाला लोकांचं समर्थन मिळत आहे.