आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव भारतीय जनता पक्षाने अखेर शुक्रवारी सायंकाळी दिल्लीतील पत्रकार परिषदेत जाहीर केले असले तरी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्याविरोधात बहिष्कारअस्त्र उपसले आहे. पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांना थेट पत्र पाठवून त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीबद्दलच नाराजी व्यक्त केली आहे. निवड जाहीर झाल्यानंतर मोदी यांनी आशीर्वाद मागण्यासाठी थेट अडवाणी यांचे निवासस्थान गाठले. उभय नेत्यांच्या अध्र्या तासाच्या भेटीत नेमके काय झाले, याचा तपशील समजला नसला तरी अडवाणींच्या  टोकाच्या नाराजीमुळे निवडणुकीआधीच ‘एकसंध परिवारा’ला हादरे बसण्याची चिन्हे आहेत.
सुषमा स्वराज, मुरली मनोहर जोशी यांचा मोदीविरोध शमविण्यात पक्षाला यश आले असले तरी अडवाणी यांचे मन वळविण्यात पक्षाला तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालादेखील यश आले नाही. संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर अडवाणी, सुषमा स्वराज आणि मुरली मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत एकाच व्यासपीठावर मोदी यांना आणावे आणि पक्षाचे भावी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव जाहीर करून पक्षात सारे काही आलबेल असल्याचे दाखवावे, अशी पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांची धडपड होती. ती विफल झाली. ज्या संसदीय मंडळाच्या बैठकीत मोदी यांची निवड झाली तिच्यावर अडवाणी यांनी बहिष्कार टाकलाच, पण त्याआधी राजनाथ सिंह यांना नाराजीपत्र पाठवून त्यांच्या कार्यपद्धतीबद्दलच तीव्र आक्षेप नोंदविले.
मोदी यांची पक्षाच्या निवडणूक प्रचार समितीच्या प्रमुखपदी निवड होताच अडवाणी यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्या वेळी त्यांच्या घराबाहेर झालेली उग्र निदर्शने लक्षात घेऊन सायंकाळीच अडवाणी यांच्या निवासस्थानाभोवती कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला गेला.
अडवाणी यांचा ‘नाराजीनामा’ माध्यमांकडून झळकला असला तरी राजनाथ सिंह यांनी मात्र त्याबाबत प्रतिक्रिया टाळली आहे. उलट, अडवाणी यांच्या मार्गदर्शनाची पक्षाला यापुढेही गरज आहे, असे त्यांनी सांगितले. एम. व्यंकय्या नायडू यांनीही अडवाणी यांना उपेक्षिले गेलेले नाही, त्यांच्याशी अनेकवार चर्चा केली गेली होती, असे सांगितले.येणारी निवडणूक ही भ्रष्टाचार आणि महागाई, या मुद्दय़ांवर लढली जाईल, अशी घोषणा मोदी यांनी केली असून त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा बगलेत ठेवून इतर समाजघटकांना जवळ करण्याची व्यूहरचना आखली गेल्याचे दिसत आहे.
भाजपचे पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार म्हणून मोदी यांची निवड जाहीर झाली,  त्यानंतर सर्वच नेत्यांची देहबोली सूचक होती. मोदी बहुधा काहीतरी बजावत असताना गडकरी सस्मित दिसत असले तरी वैदर्भिय खळाळतेपण त्यात नव्हते, सुषमा स्वराज तर कानाला खडा लावून ऐकत होत्या!
अडवाणींचे खदखदपत्र
‘हा निर्णय ज्या पद्धतीने घेतला गेला आणि संपूर्ण प्रक्रिया ज्या प्रकारे पार पाडली गेली त्याबद्दल माझी नाराजी मी तुमच्याकडे उघड केली आहेच. तुमच्या कार्यपद्धतीने मी निराश झालो आहे. बैठकीत येऊन माझी मते सदस्यांसमोर मांडावीत की नाही, याबाबत आधी मी संभ्रमात होतो. आता या बैठकीत येऊन काही उपयोग होणार नाही, हे जाणवल्याने मी त्यात सहभागी न होण्याचे ठरवले आहे’, असे अडवाणी यांनी बैठकीआधीच राजनाथ सिंह यांना पत्राद्वारे कळविले.