भाजपने २०१९ मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीसाठी आत्तापासूनच कंबर कसली आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षाने ११५ नवीन जागांवर लक्ष केंद्रीत करण्याची तयारी केली असून या जागा ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि पूर्वोत्तर राज्यांमधील आहेत.
२०१९ लोकसभा निवडणुकीला अद्याप जवळपास अडीच वर्ष बाकी आहेत. मात्र भाजप पक्षनेतृत्वानी यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली. नुकतीच  पक्षाच्या कोअर कमिटीची अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत पक्षाला २०१४ प्रमाणे बहुमताचा आकडा गाठणे कठीण असल्याचे मान्य करण्यात आले. विशेषतः हिंदी भाषिक राज्यांमधून पक्षाला पुन्हा तेवढा प्रतिसाद मिळणे कठीण असल्याचे नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना निदर्शनास आणून दिले. याशिवाय महाराष्ट्र आणि हरियाणातही पक्षाला फटका बसेल अशी शक्यता आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी भाजपने आता नवीन ११५ जागांवर नजर वळवली आहे. सात राज्यांमधील ११५ जागांवर भाजपचा डोळा आहे. या राज्यांमध्ये भाजप हा पर्यायी पक्ष म्हणून उभा राहावा यासाठी तयारी केली जात आहे. संबंधीत राज्यांच्या प्रदेशाध्यक्ष आणि सचिवांना पक्षाची बांधणी आणखी भक्कम कशी करता येईल यासंदर्भात अहवाल देण्याचे निर्देश पक्षनेतृत्वाने दिले आहेत. पक्षाला कर्नाटक आणि ओडिशामध्ये आणखी यश मिळेल अशी खात्री आहे. केंद्र सरकारनेही या सात राज्यांसाठी विविध योजना राबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील गेल्या दोन वर्षात ओडिशामध्ये तीन सभा घेतल्या आहेत. याशिवाय पूर्वोत्तर राज्यांकडेही मोदींनी लक्ष केंद्रीत केले आहे. या भागातून २५ खासदार लोकसभेत निवडून येतात. केंद्रीय मंत्र्यांना महिन्यातून दोनदा पूर्वोत्तर राज्यांच्या दौ-यावर जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेल्या भाजपची विद्यमान राजकीय परिस्थितीमुळे झोप उडाली आहे.  आता अमित शहा यांचे हे डावपेच कितपत यशस्वी ठरतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २०१९ मध्ये भाजपचे अच्छे दिन कायम असतील की अन्य कोणाचे हे बघणे उत्सुकतेचे ठरेल.