नुकतेच झालेले अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधकांच्या गदारोळामुळे निष्फळ ठरल्याचा निषेध म्हणून भाजपाकडून गुरूवारी (दि.१२ एप्रिल) एक दिवसाचे उपोषण केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पक्षाध्यक्ष अमित शाह हेही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. सत्ताधाऱ्यांनीच अशी कृती करण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. काँग्रेससह विरोधकांच्या गोंधळामुळे महत्वाची विधेयके आणि प्रश्नोत्तराचे कामकाज झाले नसल्याचा आरोप सत्ताधारी भाजपाने केला आहे. काँग्रेसने मात्र हे आरोप फेटाळले असून सरकार वस्तुस्थितीपासून पळ काढत असल्याचा प्रत्यारोप केला आहे. दरम्यान, संसदेचे कामकाज होऊ न शकल्याचे खापर भाजपा विरोधी पक्षावर फोडत असल्याचे दिसत असले तरी ते जेव्हा विरोधात होते, म्हणजे यूपीए सरकारच्या पहिल्या आठ अधिवेशनात केवळ ३८ टक्के कामकाज झाले होते. भाजपाने त्यावेळी गोंधळ घातल्यामुळे हे उर्वरित कामकाज होऊ शकले नव्हते. विशेष म्हणजे त्यावेळी अरूण जेटली यांनी भाजपाच्या गोंधळ घालण्याचे समर्थन करत विरोधकांचे हे हत्यार असून ते वापरण्यात काहीच गैर नसल्याचे सांगत आपल्या कृत्याचे समर्थन केले होते. आता नैतिकतेचे धडे देणाऱ्या भाजपाचे त्यावेळचे कृत्य मात्र अगदी उलटे होते.

काँग्रेसप्रणीत यूपीए सरकार सत्तेवर असताना २००४ ते २००९ या काळात संसदेच्या पहिल्या आठ अधिवेशनांत केवळ ३८ टक्के कामकाज झाले. कारण, त्यावेळी भाजपाने अधिवेशनात गोंधळ घातला होता. यूपीए-२ पुन्हा सत्तेवर आली तेव्हा भाजपाच्याच गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज होऊ न शकण्याच्या प्रथेने लज्जास्पद विक्रम नोंदवला. लोकसभेचे ६१ टक्के कामकाजाचे तास वाया गेले होते. याच कालावधीत राज्यसभेचेही ६६ कामकाज वाया गेले होते.

याउलट जेव्हा भाजपाप्रणीत एनडीएचे सरकार सत्तेवर होते तेव्हा म्हणजे १३ व्या लोकसभेच्या कार्यकाळात काँग्रेस विरोधात असताना २९७ विधेयके मंजूर होऊ शकली होती. यूपीए २ च्या कार्यकाळात प्रस्तावित ३२८ विधेयकांपैकी केवळ १७९ विधेयके मंजूर करता आली. त्यात जीएसटीसारखी महत्वाची विधेयके होती. ६० टक्के प्रश्न तासही भाजपाच्या गदारोळामुळे वाया गेले होते.

आता विरोधकांच्या गोंधळावर तुटून पडणारे त्यावर टीका करणारे अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मात्र त्यावेळी भाजपाच्या गोंधळाचे समर्थन केले होते. जेव्हा सरकार चर्चा टाळण्याचा प्रयत्न करते तेव्हा विरोधकांकडे असलेले ते एकमेव हत्यार आहे आणि ते वापरण्यात काहीच गैर नाही. यातून सत्ताधाऱ्यांची दुटप्पी भूमिका दिसून येत असल्याचे विरोधी पक्षांकडून बोलले जात आहे.

दरम्यान, काँग्रेसने दोन दिवसांपूर्वी दलितांवरील अन्यायाविरोधात केलेल्या एकदिवसीय उपोषणावर मोठ्याप्रमाणात टीका करण्यात आली. काँग्रेसच्या नेत्यांनी भरपेट नाश्ता करून उपोषणात सहभागी होण्यावरून समाज माध्यमावर मोठी टीका करण्यात आली होती.