देश सध्या करोनाच्या संकटातून जात असून, लॉकडाउनमुळे अनेक आव्हान निर्माण झाली आहेत. तर दुसरीकडे राजकीय आरोप प्रत्यारोपांची मालिकाही सुरूच आहे. करोना आणि लॉकडाउनच्या काळात मोदी सरकारनं घेतलेल्या निर्णयांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी सातत्यानं टीका करत आहे. राहुल गांधी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला असून, भाजपा असत्य सुद्धा अधिकृतपणे (सत्य) पसरवत आहे आणि यांची देशाला जबर किंमत मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

करोनामुळे देशातील परिस्थिती चिंताजनक असून, दररोज करोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे आर्थिक आघाडीवरही अनेक प्रश्न निर्माण झाले असून, विरोधी बाकांवरील काँग्रेसनं यावरून सरकारला धारेवर धरलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपावर मोठा आरोप केला आहे.

राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं असून, त्यात भाजपा अधिकृतपणे खोटी माहिती पसरवत आहे, असा आरोप केला आहे. “भाजपा असत्यच अधिकृतपणे पसरवत आहे. करोना चाचण्या मर्यादित केल्या व मृतांचा आकडा चुकीचा सांगण्यात आला. जीडीपीसाठी नवी मूल्याकंन पद्धती लागू करण्यात आली. चिनी आक्रमणावर पडदा टाकण्यासाठी माध्यमांना धमकावलं गेलं. पण, हा भ्रम लवकरच तुटेल आणि देशाला याची जबर किंमत मोजावी लागेल,” असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे.

राहुल गांधी यांनी या ट्विटबरोबर वॉशिग्टन पोस्टचा एक अहवालही शेअर केला आहे. ज्यात असं म्हटलं आहे की, भारतात करोनामुळे होणाऱ्या मृत्युच्या कमी संख्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. जेव्हा भारतातील रुग्णांची संख्या दहा लाख झाली, तेव्हा मृतांचा आकडा २५,००० इतका होता. मात्र, अमेरिकेत व ब्राझीलमध्ये करोना बाधितांची संख्या दहा लाख असताना मृतांचा आकडा ५०,००० हजार होता, असं अहवालात म्हटलं आहे. भारतात आतापर्यंत दहा लाख लोक करोना संक्रमित झाले आहेत. त्याचबरोबर भारत अमेरिका व ब्राझील पाठोपाठ जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.