देशात करोनाचा संसर्ग वाढत असून, मृत्यूंच्या संख्येतही दिवसेंदिवस भर पडत आहे. करोनाच्या कचाट्यात सर्वसामान्यांपासून ते अगदी व्हीव्हीआयपी व्यक्ती देखील सापडल्या आहेत. आता राजस्थानच्या राजसमंद येथील भाजपाच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे करोनामुळे निधन झाल्याचे समोर आले आहे. नुकताच त्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. या अगोदर सहाडा येथील आमदार कैलाश त्रिवेदी यांचे देखील करोनामुळे निधन झाले आहे.

मागील काही दिवसांपासून हरियाणा येथील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात आमदार किरण माहेश्वरी यांच्यावर उपचार सुरू होते. त्या राजस्थानच्या दुसऱ्या आमदार ठरल्या आहेत, ज्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आमदार किरण माहेश्वरी यांच्या निधनाबद्दल ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे. ”किरण माहेश्वरी यांचे निधन अतिशय दुःखद आहे. त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाज सेवेसाठी समर्पित केले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.” असं ओम बिर्ला म्हणाले आहेत.

आमदार किरण माहेश्वरी महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान कोटा येथे करोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळल्या होत्या. त्यांना कोटा उत्तर महापालिका निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपण्यात आली होता.

राजस्थानमधील करोनाचा वाढता संसर्ग पाहता, राज्यातील बहुतांश भागांमध्ये १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत सायंकाळी ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. तसेच, बाजारपेठा व अन्य व्यावसायिक ठिकाणं सायंकाळी ७ वाजेनंतर बंद ठेवण्यात आलेली आहेत.