भाजप नेते जीव्हीएल नरसिंहा राव यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची तुलना औरंगजेब आणि अलाउद्दीन खिलजीशी केली आहे. औरंगजेबने आपल्या कार्यकाळात अनेक मंदिरे पाडली. जेव्हा सामान्य लोकांनी त्याला विरोध केला तेव्हा दोन-तीन मंदिरे बांधून देण्याचे आश्वासन दिले. अलाउद्दीन खिलजीनेही असेच केले.. आणि आता राहुल गांधीही त्याच दिशेने जात असल्याची टीका त्यांनी केली. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राजकोट दौऱ्यावर असलेल्या नरसिंहा राव यांनी बुधवारी काँग्रेस व राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी जात आहेत. राहुल गांधी यांनी बहुसंख्यांकांना खूश करण्यासाठी धार्मिक कार्ड काढल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, राहुल यांचे मंदिरात जाणे म्हणजे नाटकीपणा आहे. मंदिरात जाऊन लोकांना भुलवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. निवडणुकांमुळे राहुल गांधींना हे मजबुरीने करावे लागत आहे, असा टोलाही लगावला.

काँग्रेस कर्नाटकमध्ये टीपू सुलतानची जयंती साजरी करत आहे. आता ते गुजरातमध्ये मोहम्मद गझनीची जयंती साजरा करण्याची तयारी करत आहेत. पण हे कदापि होणार नाही. कारण असं करून ते इथं निवडणुका जिंकू शकणार नाहीत. टीपू सुलतानने अनेक हिंदूंना मुसलमान करून त्यांना आपल्या सैन्यात दाखल केले होते, असेही ते म्हणाले.

काँग्रेसच्या युवा विंगकडून पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या ट्विट बाबतही कठोर शब्दांत टीका केली. ही देशाची थट्टा केल्यासारखं आहे. मी राहुल गांधींना सांगू इच्छितो की, आता भारतात मोगल किंवा ब्रिटिशांचे शासन नाही. इथे लोकशाही आहे. जनता ज्याला निवडते तोच नेता होतो. दिल्लीवर राज्य करणे त्यांचा मालकी हक्क नाही, हे सोनिया व राहुल गांधी यांनी लक्षात ठेवावं, असेही ते म्हणाले.