अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला आत्महत्येसाठी कथितरीत्या प्रवृत्त केल्याबद्दल अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यासह इतरांविरुद्ध पाटणा येथे नोंदवण्यात आलेला प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) आणि त्याचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) हस्तांतरित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मंजुरी दिली. या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या मुंबई पोलिसांची कार्यकक्षा मर्यादित असून या प्रकरणात सखोल तपास होणं गरजेचं आहे असं न्यायालयाने सांगितलं. हे प्रकरण सीबीआयकडे देण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर विरोधक आणि महाराष्ट्र सरकारच्या बाजूने बोलणारे असे दोन गट सोशल नेटवर्किंगवर पडल्याचे चित्र दिसून आलं. दरम्यान, गुरूवारी शिवसेना नेते राऊत यांचा शायराना अंदाज दिसून आला. त्यांनी ‘संजय ऊवाच’ या मथळ्याखाली एक ट्विट केलं होतं. त्यानंतर भाजपाचे नेते संबित पात्रा यांनीदेखील ‘कृष्ण ऊवाच’ या मथळ्याखाली एक ट्विट केलं आहे.

कृष्ण ऊवाच: “हे संजय: क्योंकि मैंने आपको दिव्य चक्षु प्रदान किया है, ज़रा अपने समीप बैठे “धृतराष्ट्र” से कहिए की पुत्र मोह में वे इंद्रप्रस्थ गवाने जा रहे है,” अशा आशयाचं ट्विट संबित पात्रा यांनी संजय राऊतांच्या ट्विटला उत्तर देताना केलं आहे.

यापूर्वी संजय राऊत यांनीदेखील एक ट्विट केलं होतं. “उनसे कहना की.. किस्मत पे इतना नाज ना करे.. हमने बारिशों मे भी जलते हुए मकान देखे है…”, असं ट्विट राऊत यांनी केलं होतं. तसंच या ट्विटखाली त्यांनी जय महाराष्ट्र असंही लिहिलं आहे. हे ट्विट नक्की कशासंदर्भात आहे याबद्दल राऊत यांनी थेट उल्लेख केलेला नाही.