01 March 2021

News Flash

मी कायमच गंगा, गंगेच्या उपनद्यांवर जलविद्युत प्रकल्प उभारण्याच्या विरोधात होते; उमा भारतींचा दावा

सोमवार सकाळपर्यंत या प्रलयामध्ये १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय

प्रातिनिधिक फोटो (फोटो सौजन्य: रॉयटर्स आणि ट्विटरवरुन साभार)

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील नंदादेवी हिमकड्याचा काही भाग कोसळल्याने रविवारी धौलीगंगा नदीला मोठा पूर आला. या प्रलयामध्ये सोमवार सकाळपर्यंत १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर १५० जण अजूनही बेपत्ता आहेत. या दूर्घटनेनंतर भाजपाच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी रविवारी रात्री ट्विटरवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या. हिमकडा तुटल्याने आलेला प्रलय हा चिंतेचा विषय असल्याचं उमा भारती यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी यासंदर्भात इशाराही दिला आहे. आपण स्वत: मंत्री असताना गंगा नदी आणि त्याच्या मुख्य उपनद्यांवर धरणं बांधून विजनिर्मिती करण्यास माझा विरोध होता असंही उमा यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर उमा भारती या जल संवर्धन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री होत्या. रविवारी हिमकडा कोसळून घडलेल्या दूर्घटनेनंतर उमा यांनी अनेक ट्विट केले आहेत. हिमकडा तुटल्याने जो प्रयल आलाय त्यामुळे जलविद्यृत निर्मितीला मोठा फटका बसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. “जोशीमठापासून २४ किलोमीटर दूर असणाऱ्या चमोली जिल्ह्यातील पैंग गावाजवळ हिमकडा तुटल्याने ऋषिगंगा नदीवर बनवण्यात आलेला वीज प्रकल्प पूर्णपणे नष्ट झाला असून या पुराचे पाणी वेगाने पुढे सरकत आहे. मी गंगा मातेला प्रार्थना करते की तिने सर्वांची रक्षा करावी. तिने सर्व प्राण्यांचे संरक्षण करावे अशी मी प्रार्थना करते,” असं ट्विट उमा यांनी केलं आहे.

अन्य एका ट्विटमध्ये उमा यांनी, काल मी उत्तरकाशीमध्ये होते आज हरिद्वारला पोहचले आहे. हरिद्वारमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचाच अर्थ या प्रलयाचा फटका हरिद्वारलाही बसू शकतो. ऋषिगंगा नदीवर झालेला हा अपघात हा चिंतेचा विषय असून यामधून इशाराही मिळत आहे, असंही म्हटलं आहे.

हिमालयांमधील नद्यांवर धरणं बांधू नेयेत असं आपण मंत्री असताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलं होतं, अशी आठवणही उमा यांनी करुन दिलीय. “मी जेव्हा मंत्री होती तेव्हा मी माझ्या मंत्रालयाच्या वतीने उत्तराखंडमध्ये हिमालयातून येणाऱ्या नद्यांवर बांधण्यात येणाऱ्या धरणांबद्दल जे प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं त्यामध्ये हिमालय हे खूपच संवेदनशील ठिकाण असून गंगा आणि तिच्या प्रमुख उपनद्यांवर वीज निर्मिती करण्यासाठी धरणे बांधली जाता कामा नये, असं म्हटलं होतं,” अशी माहिती उमा यांनी ट्विटमध्ये दिलीय.

धरणं न बांधल्याने उत्तराखंडला १२ टक्के कमी वीज मिळते ती राष्ट्रीय ग्रीडमधून पुरवण्यात यावी असंही त्या प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याचं उमा भारती यांनी सांगितलं.

या दूर्घटनेमुळे मी खूप दु:खी आहे. उत्तराखंड ही देवभूमि आहे. येथील लोकं खूप कठीण परिस्थितीमध्ये राहत असून तिबेटला लागून असलेल्या भारताच्या सीमांचे संरक्षण करतात. त्या सर्वांच्या रक्षणासाठी मी देवाकडे प्रार्थना करते, असं उमा यांनी अन्य एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.

रविवारी हिमकडा कोसळल्याने आलेल्या प्रलयात अलकनंदा नदीवरील जलविद्युत केंद्रे आणि ऋषीगंगा नदीवरील लघू जलविद्युत प्रकल्प वाहून गेल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. नंदादेवी हिमकड्याचा काही भाग सकाळी कोसळल्यानंतर धौलीगंगा, ऋषीगंगा आणि अलकनंदा या गंगेच्या उपनद्यांना रविवारी दुपारी महापूर आला. त्यामुळे त्यांच्या काठांवरील डोंगराळ भागांत हाहाकार उडाला. या प्रलयामुळे ‘नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन’चा (एनटीपीसी) धौलीगंगा नदीवरील तपोवन-विष्णूगड जलविद्युत प्रकल्प आणि ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्पाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. ऋषीगंगा नदीवरील एक लघू जलविद्युत प्रकल्पही वाहून गेल्याची माहिती इंडो-तिबेट सीमा पोलिसांच्या प्रवक्त्याने दिली.

जलविद्युत प्रकल्पांची हानी

  • प्रलयात एक लघू जलविद्युत प्रकल्प वाहून गेला, तर ‘एनटीपीसी’च्या प्रकल्पाची हानी.
  • वीज प्रकल्पावर  १०० मजूर बंधाऱ्याचे, तर पन्नासहून अधिक जण बोगद्याचे काम करीत होते.
  • तपोवन वीज प्रकल्पाच्या बोगद्यातून १६ मजुरांची सुटका, १२५ अद्याप बेपत्ता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2021 9:11 am

Web Title: bjp leader umar bharti says she always opposes projects in ganga river uttarakhand chamoli scsg 91
Next Stories
1 बोगद्यातील छिद्र आणि मोबाइल फोन ठरला ‘त्या’ १६ मजुरांसाठी तारणहार
2 न्यूयॉर्क विधानसभेने ५ फेब्रुवारी ‘काश्मीर अमेरिकन दिवस’ घोषित केला; भारत म्हणाला…
3 उत्तराखंडमध्ये प्रलय
Just Now!
X