केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भाजप नेत्यांच्या प्रक्षोक्षक विधानांना पक्षनेतृत्वाने पाठिंबा दिलेला नाही. या संदर्भात पक्षाने भूमिका स्पष्ट केल्याचा दावा केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. मात्र, या नेत्यांविरोधात पक्ष कारवाई करणार का आणि असल्यास कोणत्या प्रकारची, याबाबत मात्र प्रसाद यांनी मौन बाळगले.

भाजप नेते कपिल मिश्रा यांच्या प्रक्षोभक विधानानंतर ईशान्य दिल्लीत दंगे भडकले. सलग चार दिवस झालेल्या हिंसाचारात चाळीसहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मिश्रा यांच्याच नव्हे तर भाजपचे नेते परवेश वर्मा, आणि केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्या दिल्ली निवडणुकीतील प्रक्षोभक विधानांची गंभीर दखल उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्या. मुरलीधर यांनी घेतली होती व या भाजप नेत्यांविरोधात गुन्हे का दाखल केले गेले नाहीत, अशी विचारणाही केली होती.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या विधानांना कधीही पाठिंबा दिलेला नाही. भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली होती, असे प्रसाद यांचे म्हणणे होते. भाजप नेत्यांविरोधातील कारवाईसंदर्भात, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, असे सांगत प्रसाद यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले.

या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट् वाचा, असेही ते म्हणाले.

काँग्रेसने राजधर्म शिकवू नये- भाजप

पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या देशांमध्ये धर्माच्या आधारावर अत्याचार सहन कराव्या लागलेल्या अल्पसंख्याक व्यक्तींना भारतात आश्रय दिला जावा तसेच, नागरिकत्वही दिले जावे असे मत काँग्रेसच्याच नेत्यांनी मांडलेले होते. इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंग यांचे म्हणणे चुकीचे होते का? आता काँग्रेसने भूमिका बदलली. हा कोणता राजधर्म झाला? सोनिया गांधी यांनी भाजपला राजधर्म शिकवू नये, असा प्रत्युत्तर प्रसाद यांनी दिले. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. केंद्र सरकारला राजधर्माचे पालन करण्यास सांगावे, अशी विनंती करण्यात आली होती.