भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र सरकार काँग्रेसच्याच मार्गाने वाटचाल करत आहे. राजकीय लाभासाठी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी केला आहे. तसेच, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सध्या देशभरात अशांतता आहे व कायदा, सुव्यवस्था बिघडली आहे, ही देशासाठी चिंतेची बाब आहे, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

मायावती यांचा आज ६४ वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांनी आज पत्रकारपरिषद घेतली होती. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना लोककल्याणकारी दिवसाच्या रुपात आपला वाढदिवस साजरा करावा, असे आवाहन केले.

मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्थेची परिस्थिती बिघडलेली आहे. लाखो तरुणांसमोर आज रोजगाराचा प्रश्न आहे. देशभरातील गरिबी आणि बेराजगारीचे प्रमाणे भयानक आहे. उद्योग देशोधडीस लागले आहेत. या सर्वांमुळे देशाची अर्थव्यवस्था पुर्णपणे कोलमडली असल्याचे त्यांना सांगितले आहे.

या सर्वांचा परिणाम देशाताली सामान्य माणसाच्या जीवनशैलीवर झालेला आहे. केंद्र सरकारचे धोरण पुर्णपणे चुकीचे आहे. यामुळेच देशात आज गरिबी, अज्ञान आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.