डेहराडून : उत्तराखंडमध्ये नेतृत्वबदल होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असल्याच्या पाश्र्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत सोमवारी सकाळी दिल्लीला रवाना झाले आहेत.

रावत हे दिल्लीला रवाना झाले असल्याच्या वृत्ताला मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्याने दुजोरा दिला असला तरी राज्याच्या प्रश्नांसाठी ते दिल्लीला गेले असल्याचे सांगण्यात आले.

भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी येथे राज्य भाजपच्या मध्यवर्ती समितीची बैठक झाली त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी रावत यांना पुढील चर्चेसाठी दिल्लीत बोलाविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, उत्तराखंड भाजपप्रमुख बन्सीधर भगत यांनी, राज्यात नेतृत्वबदल होण्याची शक्यता फेटाळून लावली. रावत सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांबाबत चर्चा करण्यासाठी शनिवारी बैठक झाली, असे भगत म्हणाले. पक्षाच्या आमदारांमधील वाढता असंतोष आणि मंत्रिमंडळाच्या बहुप्रतीक्षित विस्ताराचा वेळोवेळी निर्माण होणारा मुद्दा यामुळे राज्यात नेतृत्वबदल होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.