उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणी अखेर सीबीआयने कारवाई करत भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर यांना ताब्यात घेतलं आहे. लखनऊमधून कुलदीप सेंगर यांना ताब्यात घेण्यात आलं. सीबीआयने पहाटे ४.३० वाजता कारवाई केली. सध्या सीबीयआने त्यांना कार्यालयात नेलं असून चौकशी सुरु आहे. विशेष म्हणजे गुरुवारीच सीबीआयकडे प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला होता, ज्यानंतर लगेच ही कारवाई करण्यात आली. विरोधक आणि संघटनांच्या दबावानंतर कुलदीप सेंगर यांच्यावर एफआयर दाखल करण्यात आला होता. उत्तर प्रदेश पोलिसांनी मात्र एफआयआर दाखल केल्यानंतरही अटक करण्यास नकार दिला होता. मात्र सीबीआयकडे प्रकरण सोपवण्यात आल्यानंतर तपास वेगाने सुरु झाल्याचं दिसत आहे.

जून २०१७ मध्ये आमदार आणि त्यांच्या भावांनी बलात्कार केल्याचा पीडित तरुणीचा आरोप आहे. ८ एप्रिल रोजी प्रकरणाचा योग्य तपास केला जात नसल्याचा आरोप करत तरुणीन योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसदेखील आरोपींना मदत करत असल्याचा आरोप तिने केला. धक्कादायक म्हणजे रविवारी पीडित तरुणीच्या वडिलांना अटक करण्यात आली. सोमवारी पोलीस कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला. अहवालानुसार, पीडित पप्पू सिंग याना आमदारांच्या चार साथीदार आणि पोलिसांनी बेदम मारहाण केली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. यानंतर कुलदीप सेंगर यांच्या भावाला अटक करण्यात आली.

बुधवारी आमदार कुलदीप सेंगर यांच्या पत्नीने आपले पती निर्दोष असून, त्यांची आणि पीडित तरुणीची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी केली होती. संगीता सिंग यांनी डीजीपी ओ पी सिंग यांची भेट घेतली तसंच आपले पती राजकीय षडयंत्रात अडकले आहेत असा दावाही केला होता.