मुंबईतील पश्चिम रेल्वेचे मुख्यालय अहमदाबादमध्ये हलवण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे(भाजप) खासदार किरीट सोळंकी यांनी शुक्रवारी लोकसभेत केली. खासदार सोळंकी यांच्या या मागणीमुळे मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. किरीट सोळंकी हे गुजरातच्या अहमदाबाद पश्चिमचे खासदार आहेत.
अहमदाबाद हे पश्चिम रेल्वेसाठी मध्यभागी पडते त्यामुळे ते सोयीस्कर होईल. तसेच गुजरात सरकारने याआधी अनेकवेळा रेल्वे मंत्रालय आणि केंद्र सरकारला या मागणीसाठी वारंवार पत्र पाठवले आहे. पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयासाठी गुजरात सरकारने जागाही उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती खासदार सोळंकी यांनी दिली. याआधी सागरी पोलिस प्रशिक्षण केंद्र गुजरातमध्ये हलवल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे खासदार किरीट सोळंकी यांच्या मागणीवर केंद्र सरकार काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.