उत्तर प्रदेशमधील पीलीभीत मतदारसंघातून निवडूण आलेले भाजपाचे खासदार वरुण गांधी यांच्यावर सध्या टीकेचा भडीमार होताना दिसत आहे. वरुण गांधी यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये मदत मागण्यासाठी एका स्थानिकाने खासदार वरुण गांधी यांना फोन केला असता त्यांच्यात झालेला संवाद ऐकू येत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र रात्री अपरात्री मदतीसाठी फोन केल्याने वरुण गांधी यांनी मदत करण्याऐवजी नको त्यावेळी फोन केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच मी तुमच्या बापाचा नोकर नाहीय, असं उत्तरही वरुण गांधी यांनी दिल्याचा दावा काही वृत्तवाहिन्यांनी ही ऑडिओ क्लिप ऐकवत केला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या ऑडिओ क्लिपमधील आवाज हा वरुण गांधींचा असल्याचा दावा केला जात आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पीडित व्यक्तीने वरुण गांधींना मदतीसाठी फोन केला होता. वरुण यांनी या मुलाला त्याचे नाव वगैरे विचारले. तरुणाने आपण पीलीभीतचे असल्याचे सांगत तक्रार सांगण्यास सुरुवात केली मात्र त्यानंतर ऑडिओत ऐकू येत आहे त्या प्रमाणे वरुण गांधी यांनीच त्याच्याकडे नाराजी व्यक्त केली. “भावा, रात्री हा वेळ फोन करण्याचा नसतो. जर तुला माझ्याशी बोलायचं असेल तर सकाळी फोन कर,” असं ऑडिओमधील नेत्याने तक्रारदाराला सांगितलं.

त्यावर या युवकाने, “भैया, आता काम होतं म्हणून आता फोन केला,” असं उत्तर दिलं. त्यावर या ऑडिओमध्ये ऐकू येतं आहे त्याप्रमाणे वरुण गांधी यांनी नाराजी व्यक्त करताना, “मी तुमच्या बापाचा नोकर नाहीय जे मी रात्री १० वाजता तुमच्याशी बोलू. जर तुम्हाला रात्री १२ वाजता काम असेल तर मी रात्री १० किंवा १२ वाजता तुमच्याशी बोलू शकत नाही. मला माफ करा. तुम्ही सभ्य गृहस्थाप्रमाणे मला सकाळी फोन करा,” असं सांगितल्याचा दावा केला जात आहे. यावर तरुणाने, “मी तुमच्या मतदारांपैकी एक आहे. तुम्ही नाही ऐकणार तर आमच्या तक्रारी कोण ऐकणार?” असा प्रश्न विचारला. यावर समोरुन, “सकाळी ऐकतो. मी तुमचा नोकर नाहीय,” असं उत्तर देण्यात आलं.

वृत्तवाहिन्यांनी चालवलेला हाच ऑडिओ पोस्ट करत काँग्रेसचे नेते राकेश सचान यांनी वरुण गांधींवर निशाणा साधाला आहे. “पीलीभीतचे खासदार वरुण गांधीचा खरा चेहरा पाहा. जनतेचं ऐकून घेणं तर लांबच राहिलं हे त्यांना धमकी देत मी तुमच्या बापाचा नोकर नाही जे तुमची गाऱ्हाणी रात्री १० किंवा १२ वाजता ऐकून घेऊ अशी धमकी देत आहेत. जे लोकं कायम तुमच्याबरोबर उभी राहतील अशांना प्रतिनिधी म्हणून निवडा. असे प्रतिनिधी निवडा जे कधीही तुम्हाला मदत करायला तयार असतील”, असं सचान यांनी म्हटलं आहे.

यासंदर्भात अद्याप भाजापा अथवा वरुण गांधी यांनी काही प्रतिक्रिया दिलेली नाही.