भाजपाच्या खासदार प्रज्ञा ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आहेत. त्यांनी, खासगी विमानसेवा पुरवणारी कंपनी स्पाईस जेटच्या कर्मचाऱ्यांविरोधात विमानतळ संचालकांकडे तक्रार केली आहे. ‘स्पाईस जेट’च्या विमानाने शनिवारी दिल्लीहून भोपाळमध्ये दाखल झाल्यानंतर ठाकूर यांनी विमानतळ संचालकांकडे तक्रार केली.

‘एनडीटीव्ही’च्या वृत्तानुसार, बुक केलेली सीट न मिळाल्याने नाराज झालेल्या प्रज्ञा भोपाळच्या विमानतळावर पोहोचल्यानंतरही काही वेळापर्यंत विमानातच बसून होत्या. “मी विमानात धरणं आंदोलन केलं नाही. तर, स्पाईस जेटचे कर्मचारी प्रवाशांसोबत गैरवर्तणूक करतात हे मी अधिकाऱ्यांना सांगितलं. यापूर्वीही त्यांनी माझ्याशी गैरवर्तणूक केली होती आणि आज पुन्हा त्यांनी तसंच केलं. मी ज्या सीटसाठी बुकिंग केलं होतं ते सीट मला दिलं नाही. मी नियम दाखवण्यास सांगितलं तर त्यांनी नियम दाखवण्यासही नकार दिला, अखेरीस मी संचालकांना बोलावलं आणि तक्रार केली, असं ठाकूर म्हणाल्या.

“बुक केलेली सीट न मिळाल्याबाबत तक्रार माझ्याकडे आली आहे. याबाबत सोमवारी अधिक माहिती घेतली जाईल”, असं भोपाळच्या राजा भोज विमानतळाचे संचालक अनिक विक्रम यांनी सांगितलं.