आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत असणारे उन्नावचे भारतीय जनता पार्टीचे खासदार साक्षी महाराज यांनी मंगळवारी आपल्या वाढदिवसाच्या दिवशीही एक मोठं वक्तव्य केलं आहे. साक्षी महाराज यांनी कृषी कायद्यांविरोधात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलताना खरे शेतकरी तर शेतात राबत आहेत, असं म्हटलं आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना साक्षी महाराज यांनी दिशाभूल झालेले शेतकरी असं म्हटलं आहे. आंदोलनकर्त्यांपैकी अनेकजण हे शेतकरी नसून मोठे व्यापारी आहेत, असंही साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे.

खरं सांगायचं तर खरा शेतकरी हा शेतात राबतोय, असं म्हणत साक्षी महाराज यांनी कृषी कायद्यांनाविरोध करणाऱ्या आंदोलनावर टीका केली. तुम्हाला खरे शेतकरी पहायचे असेल तर मुराबादामधील शेतकरी संम्मलेनात चला मी तुम्हाला खरे शेतकरी दाखवतो, असं साक्षी महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं. आंदोलकांपैकी अनेकजण हे मोठे व्यापारी असल्याचा दावाही त्यांनी केली. आंदोलनकर्त्यांपैकी काही ५०० बिगा जमिनीचे मालक आहेत तर काही हजार बिगा जमिनीचे. अशाच लोकांच्या पोटात नवीन कृषी कायद्यांमुळे पोटशूळ उठला आहे. सर्व देशामध्ये केवळ दोन ते तीन ठिकाणी आंदोलन सुरु आहे. पंजाबमधून लोकं सिंघू बॉर्डरवर येत आहेत. हरयाणा आणि राजस्थानमधूनही शेतकरी दिल्लीच्या सिमांवर आले आहेत कारण दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, असंही साक्षी महाराज म्हणाले. पुढे बोलताना साक्षी महाराज यांनी, हा विरोध कृषी कायद्यांना केला जात नसून निशाणा एकीकडे असला तरी हेतू काही वेगळाच आहे. खरं दु:ख सीएए आणि एनआरसीचं आहे. अनुच्छेद ३७० हटवल्यामुळे जो त्रास झालाय आणि अयोध्येमध्ये प्रभु श्री रामांचे जे मंदिर बांधले जात आहे, त्याचा खरा त्रास असल्याचे म्हटले आहे. खिसियानी बिल्ली खंभा नोच रही है या हिंदी म्हणीचा वापर करत साक्षी महाराज यांनी उगाच आपला राग शांत करण्यासाठी आरडाओरड केला जात असल्याचा टोलाही लगावला आहे.

आणखी वाचा- शेतकरी कुणाच्या तरी सांगण्यावरून आंदोलन करतायेत; हेमा मालिनी यांनी उपस्थित केली शंका

अखिलेश यांना सुनावलं

समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यावरही साक्षी महाराज यांनी टीका केली आहे. अखिलेश यादव हे सुशिक्षित व्यक्ती आहेत. मी त्यांच्याबद्दल जास्त काही बोलू इच्छित नाही. मात्र ते सध्या संभ्रमावस्थेत दिसतायत, असं मत साक्षी महाराजांनी व्यक्त केलं. अखिलेश हे कधी राम भक्त असल्याचं दाखवतात तर कधी राम विरोधी असल्याचं जाहीर प्रदर्शन करतात. ते योग्य मार्गावर चालू शकत नाही. मात्र त्यांनी योग्य मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चांगला मार्ग हा कल्याणकारी मार्ग असतो, असा टोला साक्षी महाराजांनी अखिलेश यांना लगावला आहे.